मुलींच्या वसतिगृहाचा मार्ग मोकळा
मुलींच्या वसतिगृहाचा मार्ग मोकळा
आठ कोटी ५७ लाख ८९ हजार रुपयांचा निधी मंजूर; वर्षानुवर्षांची प्रतीक्षा संपणार
अलिबाग, ता. १० (वार्ताहर) : तालुक्यातील मागासवर्गीय मुलींसाठी चालणाऱ्या शासकीय वसतिगृहाला अखेर स्वतःची इमारत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक वर्षांपासून भाडेतत्त्वावर चालणाऱ्या या वसतिगृहासाठी आठ कोटी ५७ लाख ८९ हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर झाला असून, यास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे अलिबागमध्ये लवकरच मुलींसाठी अत्याधुनिक व सुरक्षित वसतिगृह उभे राहणार आहे.
मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने रायगड जिल्ह्यात विविध शासकीय वसतिगृहांची उभारणी केली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत अलिबाग, महाड, तळा, सुधागड, तसेच जावळी (माणगाव) येथे मुला-मुलींसाठी निवास व्यवस्था उपलब्ध आहे. यापैकी दोन वसतिगृह आणि निवासी शाळांचे संचालन मालकीच्या इमारतींमधून होते, तर उर्वरित पाच वसतिगृह खासगी इमारतींमधून चालतात. अलिबागमधील मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह गोंधळपाडा परिसरात पूर्वी मालकीच्या इमारतीत होते, मात्र ती इमारत जीर्ण झाल्याने वसतिगृह खासगी इमारतीत हलविण्यात आले. तेव्हापासून ते सतत भाडेतत्त्वावरच चालत असल्याने मुलींसाठी राहण्याची सुविधा पुरेशी सक्षम नव्हती. सुरक्षितता, स्थैर्य, तसेच आधुनिक सोयीसुविधांची गरज ओळखून स्वतंत्र वसतिगृहाची आवश्यकता वारंवार अधोरेखित होत होती. या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील मागासवर्गीय मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी, तसेच शासकीय वसतिगृहाला कायमस्वरूपी इमारत उपलब्ध व्हावी, यासाठी शेकापचे सरचिटणीस यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे निवेदन सादर केले होते. ही मागणी मान्य करत राज्य शासनाने आठ कोटी ५७ लाख ८९ हजार रुपयांच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता दिली आहे. लवकरच या वसतिगृहाचे भूमिपूजन होऊन कामाला वेग मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक स्तरावर व्यक्त होत आहे. हक्काच्या इमारतीमुळे मुलींना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण निवास व्यवस्था मिळणार असून, त्यांच्या शिक्षणाच्या संधी अधिक सक्षम होणार आहेत.
.........
जिल्ह्यातील शासकीय वसतिगृह व निवासी शाळांची यादी
महाड : मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह
तळा : मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह
अलिबाग : मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतिगृह
महाड : मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह
अलिबाग : मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह
पाली-सुधागड : मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह
जावळी (माणगाव) : अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी शासकीय निवासी शाळा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

