विनातिकीट प्रवाशांकडून १४० कोटींची वसुली
विनातिकीट प्रवाशांकडून
१४० कोटींची वसुली
पश्चिम रेल्वेच्या तिजाेरीत भर; एसी लोकलमध्ये २.४० कोटींचा दंड
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : विनातिकीट आणि अनियमित प्रवासावर आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वेने राबविलेल्या तिकीट तपासणी मोहिमांना मोठे यश मिळाले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत पश्चिम रेल्वेने सुमारे १४० कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. ही रक्कम गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ५० टक्के अधिक आहे.
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक यांनी दिलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ वाणिज्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तिकीट तपासणी पथकांनी उपनगरी लोकल, मेल-एक्स्प्रेस, पॅसेंजर तसेच उत्सव स्पेशल गाड्यांमध्ये सातत्याने तपासणी अभियान राबवले. या काळात २१.७० लाखांहून अधिक विनातिकीट व अनियमित प्रवाशांवर कारवाई करण्यात आली आहे. नोव्हेंबर २०२५मध्ये २.८० लाख प्रकरणांतून १८.२५ कोटींची वसुली झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के वाढ झाली आहे.
उपनगरी एसी लोकलमध्येही काटेकोर तपासणी करण्यात आली. सामान्य तिकिटावर बेकायदा प्रवास करणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. एप्रिल ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ७५ हजारांहून अधिक प्रकरणांतून २.४० कोटींचा दंड वसूल करण्यात आला असून, ही वसुली मागील वर्षीपेक्षा ८५ टक्के अधिक आहे.
----
विक्रमी कामगिरी
चर्चगेट मुख्यालयातील उपमुख्य तिकीट निरीक्षक अशुतोष कुमार सिंह यांच्या कामगिरीची विशेष दखल घेण्यात आली आहे. मागील १८ वर्षांत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सिंह यांनी जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या अवघ्या ११ महिन्यांत नऊ हजार २००पेक्षा अधिक प्रकरणांतून १.०८ कोटींची वसुली केली आहे. त्यांची सरासरी दैनंदिन वसुली सुमारे ४० हजार इतकी आहे. दररोज सुमारे ३४ प्रकरणे उघडकीस आणली जातात. १८ ऑक्टोबरला एका दिवसातच १५०पेक्षा अधिक प्रकरणांतून २.२४ लाखांची विक्रमी वसुली त्यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

