अखिल चित्रे यांची मागणी फेटाळली
अखिल चित्रे यांची मागणी फेटाळली
प्रथमदर्शनी याचिकाकर्त्यांविरुद्ध गुन्हा सिद्ध : उच्च न्यायालय
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १० : न्यायालयाच्या परिसरात वकिलावर हल्ला केल्याच्या आरोपाप्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्याची शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) अखिल चित्रे यांची मागणी उच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळून लावली. प्रथमदर्शनी पुराव्यांवरून याचिकाकर्त्यांविरुद्ध गुन्हा सिद्ध होत असल्याचे निरीक्षणही न्यायालयाने याचिका फेटाळताना नोंदवले.
प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) तपासाची कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब यांचा विचार करता, आरोपीविरुद्ध गुन्हा होत नाही, असे म्हणता येत नाही. उलट, अन्य आरोपींसह याचिकाकर्त्याविरुद्ध प्रथमदर्शनी गुन्हा स्पष्टपणे सिद्ध होतो. उपलब्ध माहितीनुसार याचिकाकर्त्याचा सहभाग दिसून येत असल्याचे निरीक्षणही न्या. अजय गडकरी आणि न्या. रणजीत भोसले यांच्या खंडपीठाने नोंदवले. तत्पूर्वी, ॲमेझॉन आणि मनसेमध्ये मराठीच्या मुद्द्यावरून वाद सुरू आहे. त्यावरील सुनावणीनंतर ॲमेझॉनचे प्रतिनिधित्व करणारे वकील दिंडोशी न्यायालयातून बाहेर पडताना तीन अज्ञान व्यक्तींनी त्यांचे नाव विचारून त्यांना मारहाण करून पळ काढला. काही वकिलांनी चित्रे यांना न्यायालयाच्या आवारातील वाहनतळातून त्यांचे वाहन काढताना पाहिले, तसेच वकिलाला मारहाण करणाऱ्यांपैकी एक व्यक्तीही त्यांच्या गाडीत बसल्याचे पाहिल्याचा दावा केला; परंतु आपला या हल्ल्यात सहभाग नव्हता, याबाबत आपल्याला काहीच माहिती नव्हती, असा बचाव चित्रे यांनी केला; परंतु त्यांचा हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळून लावला. ज्या पद्धतीने हल्ला झाला त्याचा अर्थ हा या खटल्याचा भाग असू शकतो, असेही स्पष्ट करून २०२१ पासून चित्रे यांना मिळालेला अंतरिम दिलासा वाढविण्यासही नकार दिला आणि याचिका फेटाळून लावली.
काय प्रकरण?
ॲमेझॉन अॅपवर मराठी भाषेचा पर्याय नसल्याने राज ठाकरेंकडून ॲमेझॉनचे प्रमुख जेफ बेझोस यांना पत्र पाठवण्यात आले. त्यांच्या अॅपवर मराठी भाषेचा समावेश करण्यास सांगितले होते. अॅपद्वारे तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळमसारख्या प्रादेशिक भाषा वापरल्या जातात; परंतु मराठीचा पर्याय नसल्याकडे पत्रातून लक्ष वेधले होते; परंतु त्यावर कोणतेही उत्तर न मिळाल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. मनसेकडून ॲमेझॉनचे पोस्टर फाडल्याचा आरोप करून ॲमेझॉन ऑनलाइन पोर्टलने न्यायालयात मनसेविरुद्ध अनेक दिवाणी आणि फौजदारी खटले दाखल केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

