काड सिद्धेश्वर मार्गांवर तिसऱ्यांदा खड्डा, वाहतुकीची कोंडी
काडसिद्धेश्वर मार्गावर धोकादायक खड्डा
कांदिवली पश्चिमेत वाहतूक कोंडीची समस्या
कांदिवली, ता. १३ (बातमीदार) ः कांदिवली पश्चिमेतील चारकोप-पोयसर लिंक रोड आदर्शनगर प्रवेशद्वाराजवळ रस्त्यावर खड्डा पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. सुरक्षिततेसाठी स्थानिकांनी तिथे कुंडी ठेवली आहे. ६० मीटरच्या अंतरावर हा तिसरा खड्डा पडल्याने महापालिकेने या मार्गाचे निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप वाहनचालक करीत आहेत.
रस्ते विभागाने या भागातील कामाची सखोल चौकशी करावी, अन्यथा मोठा अपघात होण्याची भीती वाहनचालक वर्तवत आहेत.
चारकोप- पोयसर लिंक रोड म्हणजेच काडसिद्धेश्वर मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. आदर्शनगर प्रवेशद्वाराच्या बाजूला रस्ता खचून खड्डा पडला आहे. अपघात होऊ नये, यासाठी स्थानिकांनी या खड्ड्यात झाडाची कुंडी ठेवून त्यावर बॅरिकेड्स लावले आहेत. रात्रीच्या वेळी अचानक बॅरिकेड्स समोर आल्याने वाहनचालकांची फसगत होते. अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, पालिकेकडे तक्रार करूनदेखील १० दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणतीही उपाययोजना पालिकेकडून करण्यात आलेली नाही. दोन वर्षांपूर्वी बाजूलाच या रस्त्यावरून एक ट्रक जात असताना अचानक रस्ता खचल्याने त्यात ट्रकचे मागचे चाक अडकले, त्यामुळे मोठा खड्डा पडला होता.
ट्रक काढल्यानंतर दोन दिवसांत दहा बाय आठ फुटाचा मोठा खड्डा पडून मातीचा ढिगारा २० फूट खोल भूमिगत मुख्य मलनिस्सारण वाहिनीत गडप झाला होता. पालिकेने भूमिगत मलनिस्सारण वाहिनीमध्ये गेलेली माती काढून संपूर्ण मॅनहोल नव्याने बांधले. दोन महिन्यांपूर्वी ३० मीटरच्या अंतरावर खड्डा पडून बेस्ट बसचे चाक फसले होते. त्या ठिकाणीदेखील रस्त्याला मोठे भगदाड पडले. दोन महिन्यांपासून काम सुरू असताना तिसऱ्या ठिकाणी खड्डा पडला आहे. पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी अद्याप काम हाती घेतले नसल्याने पालिकेला याचे गांभीर्य नाही, असा आरोप होत आहे.
मागील बाजूस सुरू असलेले खड्ड्याचे काम आणि सध्या पडलेल्या खड्ड्यात लावण्यात आलेले बॅरिकेड्स यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. दररोज हजारो प्रवाशांसह वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने तातडीने खड्डेदुरुस्ती करून मार्ग सुरळीत करावा.
- गजानन गवई, सामाजिक कार्यकर्ते
भूमिगत मलनिस्सारण वाहिनीचे काम सुरू असल्याने पोकळी निर्माण झाली आहे. बाजूलाच काम सुरू आहे. याबाबत आर दक्षिण विभाग तसेच मलनिस्सारण विभागाशी पत्रव्यवहार केला आहे. लवकरच निर्णय घेऊन काम करण्यात येईल.
- राहुल पवार, दुय्यम अभियंता, रस्ते विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

