नवघर-माणिकपूरची पाणीटंचाई सुटणार
नवघर-माणिकपूरचा पाणीप्रश्न सुटणार
अमृत योजनेंतर्गत जलवाहिन्या बदलण्याच्या कामाला गती
वसई, ता. १३ (बातमीदार) ः वसई-विरार शहराचे नागरीकरण झपाट्याने होत आहे. शहराला पाण्याची कमतरता भासत आहे. याच अनुषंगाने अमृत योजनेंतर्गत जीर्ण जलवाहिनी बदलण्याचे काम हाती घेण्यात आल्याने नवघर-माणिकपूर भागाची पाणीटंचाईतून सुटका होणार आहे.
केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत वसई-विरार शहरातील पाणीवितरण व्यवस्था बळकटीकरणासाठी ४९४ कोटींची कामे सुरू आहेत. या कामांतर्गत विविध प्रकारच्या व्यासाच्या जलवाहिनीचे काम बाभोळा येथे सुरू आहे. बविआ अध्यक्ष तथा माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या हस्ते माजी महापौर नारायण मानकर, माजी महापौर प्रवीण शेट्टी, माजी सभापतींच्या उपस्थितीत या कामाचा शुभांरभ झाला होता. या कामांअंतर्गत नवघर-माणिकपूर शहरात सनसिटी परीयरान ७.५० लक्ष लिटर क्षमतेची टाकी, आनंदनगर परिसरात ७.५० क्षमतेची टाकी होणार आहे. या कामांमुळे नवघर-माणिकपूर परिसरातील १०० फुटी मार्ग सनसिटी परिसराची पाणीटंचाई सुटणार असल्याचे माजी महापौर नारायण मानकर यांनी सांगितले.

