विरार-चंदनसार दरम्यान प्रवाशांची गैरसोय
विरार-चंदनसार दरम्यान प्रवाशांची गैरसोय
मॅजिक रिक्षा सुरू करा; फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचची मागणी
विरार ता. १३ (बातमीदार) : विरार ते चंदनसारदरम्यान प्रवाशांची संख्या मोठी आहे, मात्र या मार्गावर विरारहून चंदनसारपर्यंत येण्यास रिक्षावाले नकार देतात. त्यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी या मार्गावर मॅजिक रिक्षा सुरू करण्याची मागणी फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचने परिवहन विभागाकडे केली आहे.
सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना विरारहून चंदनसार येथे जाण्यासाठी वाहनाकरिता बराच वेळ ताटकळत उभे रहावे लागते. ट्रेनचा प्रवास करून थकून आलेल्या येथील नागरिकांना या परिस्थितीचा सामना रोजच करावा लागतो. प्रवाशांची ही गैरसोय दूर करण्यासाठी विरार ते चंदनसार या मार्गावर सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी मॅजिक रिक्षाला परवानगी द्यावी, या मागणीचे निवेदन प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय विरार, तसेच वरिष्ठ पोलिस निरीक्षक विरार यांना फुले, शाहू, आंबेडकर विचार मंचच्या वतीने अध्यक्ष रमेश सोनावणे, उपाध्यक्ष राजेश राऊत यांनी दिले.

