शेकडो शिवभक्तांनी केली पद्मदुर्ग किल्ल्याची स्वच्छता
शेकडो शिवभक्तांनी केली पद्मदुर्ग किल्ल्याची स्वच्छता
मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्थांचा पुढाकार
मुरूड, ता. १३ (बातमीदार) : मुरूड पद्मदुर्ग जागर व गड भ्रमण सामाजिक संस्था यांच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे दि. १२ डिसेंबर रोजी ऐतिहासिक पद्मदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत शेकडो शिवभक्त, युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमसंस्काराची अनुभूती घेतली.
बोटीद्वारे किल्ल्यात प्रवेश करण्यापूर्वी शिवभक्तांनी दुर्गादेवी श्रीकोटेश्वरी मातेचे पूजन करून गडपूजन केले. त्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांत स्वच्छता मोहिमेला सुरुवात करण्यात आली. पावसाळ्यानंतर वाढलेले गवत, झुडपे काढणे, तोफा स्वच्छ करणे, तुटलेल्या पायऱ्या बसवणे तसेच प्लॅस्टिक व इतर कचरा संकलित करण्याचे काम करण्यात आले.
या वेळी संस्थेचे अध्यक्ष आशिलकुमार ठाकूर, उपाध्यक्ष राहुल कासार, सचिव महेंद्र मोहिते यांच्यासह विविध गडप्रेमी संघटनांचे सदस्य उपस्थित होते. मुरूड समुद्रकिनाऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर अरबी समुद्रात राजे शिवछत्रपती महाराजांनी पद्मदुर्ग किल्लाची निर्मिती केली. जिल्ह्याचे खासदार सुनील तटकरे यांनी अलीकडेच मुरूडमधील जाहीर कार्यक्रमात पद्मदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी दोन कोटी रुपये मंजूर झाल्याची घोषणा केली. पद्मदुर्ग संवर्धनासाठी मंजूर निधीची अद्याप अंमलबजावणी न झाल्याने शिवप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

