उपजीविका कौशल्य प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद
उपजीविका कौशल्य प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद
गावात स्वावलंबनाची नवी दिशा
माणगाव, ता. १३ (वार्ताहर) : माणगाव तालुक्यातील मांगरूळ ग्रामपंचायतीत ग्रामीण महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपजीविका कौशल्य विकास प्रशिक्षणाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. लोक प्रतिष्ठान, धाराशिव यांच्या माध्यमातून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना २.० अंतर्गत माणगाव तालुक्यातील १७ गावांमध्ये हा उपक्रम राबविला जात असून, मांगरूळमध्ये त्याचे विशेष स्वागत झाले.
सरपंच शीतल वारीक, महिला जिल्हा संघटना प्रमुख नीलिमा घोसाळकर आणि पाणलोट सचिव शेखर घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. या वेळी ग्रामपंचायत सदस्य नंदिनी पेंढारी, कांचन धसाडे, अपर्णा लोखंडे, निलिमा शिंदे, संदेश पवार यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
प्रशिक्षक पांडुरंग घोडके यांनी पाणलोट विकास कार्यक्रमाचा उद्देश व महिलांसाठी उपलब्ध शासकीय योजनांची माहिती दिली, तर राहुल देशमुख यांनी बचत गटांच्या शिस्तबद्ध कामकाजाचे महत्त्व स्पष्ट केले. या उपक्रमामुळे महिलांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, गावाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे.

