वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत

वसई विरार महानगरपालिका निवडणुकीत

Published on

वसई-विरार मनपा निवडणुकीचे बिगुल
पाच वर्षांनी रखडलेल्या निवडणुकीची घोषणा
विरार, ता. १६ (बातमीदार) ः वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीची घोषणा सोमवारी (ता. १५) निवडणूक आयोगाने केली. यानंतर आता सर्वपक्षीयांनी कंबर कसली असून संभाव्य उमेदवारांचे अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली आहे. तर, ऐन संक्रांतीच्या काळात आलेली ही निवडणूक कोणावर संक्रांत आणते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेसाठी बहुजन विकास आघाडीने क्रमविकास आघाडीशी युती केली आहे. महानगर पालिकेची तीच युती कायम राहते का? हे येत्या काही काळात समजणार आहे.
महानगरपालिकेच्या स्थापनेपासून पालिकेवर बविआची सत्ता राहिली आहे. मागील निवडणुकीत भाजपचा केवळ एकच उमेदवार नगरसेवक पदी विराजमान झाला होता. तर, राष्ट्रवादी-काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आला नव्हता. दरम्यान, यावेळी सर्वच पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली आहे. यानुसार बविआच्या काही माजी नगरसेवकांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर, भाजपकडेही सक्षम उमेदवार नसल्याने त्यांनी आपला मोर्चा बविआच्या माजी नगरसेविकेकडे वळविला आहे. यंदा महायुतीने वसईतील विधानसभेच्या दोन्ही जागा आणि बोईसरची अर्धी जागा जिंकल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये पालिकेत कमळ फुलण्याची आशा निर्माण झाली आहे. मात्र, भाजप नेत्यांनी निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष केल्यास पक्षाला फटका बसण्याची शक्यता राजकीय निरीक्षकांनी व्यक्त केली आहे. तर, एकनाथ शिंदे गट आणि भाजपची युती होणार असली, तरी या युतीत ५०-५० टक्के जागावाटपावर गाडी अडण्याची शक्यता शिंदे गटाच्या एका वरिष्ठ नेत्याने वर्तवली आहे.
तर, दुसरीकडे बहुजन विकास आघाडी आणि क्रमविकास आघाडीने जिल्हा परिषदेसाठी युती केली होती. पालिकेतही ही युती कायम राहण्याचे संकेत मिळत आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला पालिकेच्या स्थापनेपासून निवडणुकीत आपले खाते उघडता आले नाही. एकूणच, यंदाची वसई-विरार मनपा निवडणूक अत्यंत चुरशीची होणार यात शंका नाही.

मागील निवडणुकीतील पक्षीय बलाबल
एकूण जागा ११५
बहुजन विकास आघाडी १०७
शिवसेना ५,
भाजप १,
मनसे १
अपक्ष १

११५ नगरसेवकांचे २९ प्रभाग
वसई-विरार पालिकेच्या निवडणुकीसाठी ११५ नगरसेवकांचे २९ प्रभाग तयार करण्यात आले आहे. यामध्ये चारचे २८ प्रभाग आणि एक प्रभाग हा तीनचा असणार आहे. या निवडणुकीसाठी ११ लाख २७ हजार ६३७ इतके मतदार असणार असून त्यात पाच लाख २५ हजार ७५० इतक्या महिला आणि सहा लाख एक लाख ७४१ पुरुष मतदार असणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com