वडाळ्यातील प्रभाग १७८ नागरी प्रश्नांच्या विळख्यात!

वडाळ्यातील प्रभाग १७८ नागरी प्रश्नांच्या विळख्यात!
Published on

वडाळ्यातील प्रभाग १७८ नागरी प्रश्नांच्या विळख्यात!
पुनर्विकास, पाणी, रस्ते आणि जलभराव नागरिकांसाठी डोकेदुखी
मिलिंद तांबे ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १६ : महापालिकेच्या एफ दक्षिण विभागातील वडाळा परिसरात असलेला प्रभाग क्रमांक १७८ सध्या विविध नागरी समस्यांमुळे चर्चेत आहे. येथे ठाकरेंच्या शिवसेनेतून नगरसेवक झालेले अमेय घोले सध्या शिंदेंच्या शिवसेनेत गेले असून, ते युवासेनेच्या सरचिटणीस पदावर ही विराजमान आहेत.
मध्य मुंबईतील महत्त्वाचा भाग असलेल्या या वॉर्डमध्ये रेल्वे, रस्ता वाहतूक आणि निवासी वस्ती यांचे दाट जाळे असले तरी मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवरून नागरिकांत तीव्र नाराजी आहे.
लोकसभेच्या दक्षिण मध्य मुंबई आणि विधानसभेच्या वडाळा मतदारसंघात हा प्रभाग मोडतो. येथे ठाकरेंच्या शिवसेनेचे अनिल देसाई खासदार, तर भाजपचे कालिदास कोळंबकर आमदार आहेत. तसा हा परिसर शिवसेनेचा गड समजला जातो. वडाळा रेल्वे स्थानक, मोनोरेल मार्ग आणि पूर्व द्रुतगती महामार्गाच्या जवळीकतेमुळे या वॉर्डचे शहरातील स्थान धोरणात्मक मानले जाते, मात्र जुने चाळींचे पुनर्विकास प्रकल्प रखडणे, भोगवटा प्रमाणपत्रांचा प्रश्न, तसेच अपुऱ्या पायाभूत सुविधा यामुळे विकासाची गती मंदावली आहे.
प्रभाग क्रमांक १७८ हा मध्य मुंबईतील दाट लोकवस्तीचा आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा भाग आहे.
या वॉर्डची अंदाजे लोकसंख्या ५५ ते ६५ हजारांदरम्यान आहे.या लोकसंख्येपैकी मतदारांची संख्या सुमारे ३२ ते ३६ हजार आहे. पुरुष मतदारांचे प्रमाण थोडे अधिक असले तरी महिला मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. तरुण मतदारांचा वाटा चांगला असल्याने ते निवडणूक निकालावर प्रभाव टाकू शकतात.
सामाजिक रचनेत मराठी समाज संख्येने सर्वाधिक असून, सुमारे ४५ ते ५० टक्के आहे.
मराठा, कुणबी, कोळी, आगरी तसेच अनुसूचित जातीतील घटकांचा यात समावेश आहे. त्‍यानंतर बौद्ध समाजाचे प्रमाण २० ते २५ टक्के असून, हा समाज संघटित व राजकीयदृष्ट्या सक्रिय मानला जातो. तसेच मुस्लिम समाज सुमारे १० ते १२ टक्के, तर उत्तर भारतीय समाज ८ ते १० टक्के आहे. गुजराती, मारवाडी व जैन समाज ३ ते ५ टक्के इतक्या प्रमाणात आहेत. एकूण पाहता मराठी आणि बौद्ध समाज मिळून सुमारे ६५ ते ७० टक्के मतदारसंख्या तयार होते. त्यामुळे स्थानिक प्रश्न, उमेदवाराचा जनसंपर्क आणि समाजसंतुलन हे या वॉर्डमधील निवडणुकीत निर्णायक ठरतात.
या प्रभागात मध्यमवर्गीय व कामगारवर्गीय लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. जुन्या चाळी, कोकणी/मराठी वस्ती आणि म्हाडा वसाहतींचे प्रमाण या प्रभागात मोठे आहे. काही भागांत पुनर्विकास प्रकल्प प्रलंबित आहेत, तर काहींचे काम सुरू आहे. औद्योगिक व निवासी पट्ट्यालगत हा प्रभाग आहे.

राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे मुद्दे
- मराठी आणि बौद्ध समाज मिळून ६५ ते ७० टक्के मतदार
- संघटित समाजांचा प्रभाव मोठा
- पुनर्विकास, ओसी, पाणी, गटार, घरांचा प्रश्न हे निर्णायक मुद्दे
- स्थानिक चेहरा असलेला उमेदवार प्रभावी ठरतो.


२०१७ मधील चित्र
:
१) विजयी - अमेय घोले - शिवसेना - ७,०५९ मते
२) जेसाल कोठारी - भाजप - ६,९७३ मते
३) जनार्दन किर्डाट काँग्रेस – ४,४८३ मते

प्रमुख नागरी प्रश्न
- पाणीपुरवठा व गटार व्यवस्था
- रस्त्यांची दुरवस्था व वाहतूक कोंडी

- पुनर्विकासासाठी रखडलेली घरे व चाळी
- पावसाळ्यात पाणी तुंबणे
- कचरा व्यवस्थापन व स्वच्छता
- भोगवटा प्रमाणपत्र व नियमितीकरणाचे प्रश्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com