निवडणुका जाहीर झाल्या आणि वसई-विरार बॅनर मुक्त होऊ लागले
वसई-विरार शहर झाले ‘बॅनरमुक्त’
पालिकेकडून राजकीय होर्डिंगवर कारवाई; शहराने घेतला मोकळा श्वास
विरार, ता. १७ (बातमीदार) : वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुकांचे बिगुल वाजताच शहरात आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेचा पहिला मोठा परिणाम शहराच्या विद्रुपीकरणावर झाला असून, प्रशासनाने युद्धपातळीवर कारवाई करत शहर ‘बॅनरमुक्त’ करण्यास सुरुवात केली आहे. वर्षानुवर्षे झाडांवर, विद्युत खांबांवर आणि चौकाचौकात लटकलेले राजकीय नेते अखेर पालिकेच्या कारवाईमुळे खाली उतरले आहेत.
गेल्या अनेक काळापासून शहरात राजकीय बॅनर, होर्डिंग आणि कटआऊट्सचा सुळसुळाट झाला होता. यामुळे शहराला बकाल स्वरूप प्राप्त झाले होते. अनेकदा तक्रारी करूनही पालिकेचा जाहिरात विभाग राजकीय दबावापोटी कारवाई करण्यास धजावत नसल्याची टीका होत होती, मात्र आता निवडणूक आयोगाच्या नियमांमुळे पालिकेने आक्रमक पवित्रा घेत अनधिकृत बॅनर हटवण्याची मोहीम राबवली आहे. शहरातील पूल, रस्ते दुभाजक आणि सार्वजनिक जागा आता स्वच्छ आणि मोकळ्या दिसू लागल्या आहेत.
नागरिकांचा सवाल
बॅनर हटवल्यामुळे परिसर सुंदर दिसत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे; मात्र जी तत्परता आचारसंहितेत दिसते, ती पालिकेने वर्षभर का दाखवली नाही? इतर वेळी अधिकारी काय झोपा काढत असतात का? असा संतप्त सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. केवळ निवडणुका आल्यावरच शहर स्वच्छ करण्यापेक्षा पालिकेने कायमस्वरूपी ही शिस्त लावावी, अशी मागणी जोर धरत आहे.

