माणगावच्या स्वरा बामगुडेची रायगड जिल्हा क्रिकेट संघात निवड
माणगावच्या स्वरा बामगुडेची रायगड जिल्हा क्रिकेट संघात निवड
ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी यशकथा
माणगाव, ता. २० (वार्ताहर) : माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या सुधाकर नारायण शिपुरकर व गणेश यशवंत वाघरे इंग्रजी माध्यम शाळेची माजी विद्यार्थिनी स्वरा नंदिनी बामगुडे हिची रायगड जिल्हा मुलींच्या क्रिकेट संघात निवड झाली आहे. तिच्या या यशाने संपूर्ण माणगाव शहर भारावून गेले असून, एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने कठोर परिश्रम, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर जिल्हा स्तरावर आपले नाव कोरणे ही केवळ वैयक्तिक नव्हे, तर शहरासाठी प्रेरणादायी यशकथा ठरली आहे.
स्वरा केवळ उत्कृष्ट क्रिकेटपटू नाही, तर अभ्यासातही चमकदार आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत ९५ टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावणारी स्वरा सध्या नवी मुंबईच्या नेरूळ येथील डॉ. डी. वाय. पाटील कॉलेजमध्ये उच्च शिक्षण घेत आहे. शिक्षणासोबतच ती भारतरत्न सचिन तेंडुलकर क्रिकेट अकॅडमीमध्ये नियमित सराव करीत असून, आपल्या क्रीडा कौशल्याला सुधारत आहे. स्वरा बामगुडेने शाळेतील काळापासूनच क्रिकेटची स्वप्ने पाहायला सुरुवात केली. पहाटे सहा वाजता धनसे मैदानावर सराव करणारी स्वरा आज रायगड जिल्हा संघात महत्त्वाचे स्थान मिळवण्यास यशस्वी झाली आहे. यामध्ये तिच्या आई-वडिलांनी, शिक्षकवृंदाने, शाळेच्या व्यवस्थापनाने तसेच प्रशिक्षकांनी वेळोवेळी मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. सध्या नवी मुंबईत तीन सत्रांत दररोज सराव करीत असलेली स्वरा यष्टिरक्षक आणि आघाडीची फलंदाज म्हणून संघामध्ये दुहेरी जबाबदारी पार पाडत आहे. तिचा सातत्यपूर्ण सराव, तांत्रिक कौशल्य आणि आत्मविश्वास पाहून महाराष्ट्र राज्य क्रिकेट निवड समितीने तिला रायगड जिल्हा संघात स्थान दिले. लवकरच ती महाराष्ट्रातील विविध स्पर्धांमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे.

