

कामोठे, ता. २० (बातमीदार) : शहरातील रहिवाशांना सातत्याने पाणीटंचाई जाणवत आहे. या प्रश्नावर आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी सिडको प्रशासनाला दिला आहे.
सेक्टर सहामधील रहिवाशांना पाणीटंचाईची समस्या भेडसावत असून याविषयी सिडकोला निवेदन दिले आहे. वेळोवेळी आंदोलन केले आहे; मात्र पाणीप्रश्न अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. सेक्टर सहामधील रहिवाशांनी कमी दाबाने होणारा अपुरा आणि अनियमित पाणीपुरवठा, जुनी जलवाहिनी आणि वाढीव पाणीबिल याविषयी कामोठे कॉलनी फोरमचे कार्याध्यक्ष ॲड. समाधान काशीद यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (ता. १९) सेक्टर सहा अ च्या सिडकोच्या पाणी विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. या वेळी रहिवाशांनी पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांना अपुऱ्या आणि अनियमित पाणीपुरवठ्याबद्दल जाब विचारला. ज्येष्ठ नागरिक व महिलांनी संताप व्यक्त केला.
समाधान काशीद यांनी सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधून परिस्थितीची माहिती दिली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ पाणीपुरवठा विभागातील प्लंबर व कर्मचारी यांना सेक्टर सहामध्ये पाठवून समस्याची माहिती घेण्यास सांगितले.