निवडणूक प्रचार साहित्य बाजार थंड!
निवडणूक प्रचार साहित्य बाजार थंड!
युती-आघाड्यांमधील पेचामुळे डिजिटल प्रचारावर जोर
नितीन बिनेकर ः सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ : लालबाग ही प्रचार साहित्याची देशातील सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. शिवसेना, काँग्रेस, भाजप, मनसेसह सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रचार साहित्य म्हणजे टी-शर्ट, टोपी, बिल्ले, दुपट्टे, झेंडे, पोस्टर्स येथे विक्रीसाठी उपलब्ध असते. मुंबई महापालिकेसाठी उमेदवारी अर्ज करण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, आघाडी-युतीतील जागावाटपाचा पेच न सुटल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट पसरला आहे. मात्र, एक-दोन दिवसांत बाजारात गर्दी होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.
महापालिका निवडणुकीची अधिकृत घोषणा झाली असली तरी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख, अर्जांची छाननी आणि अंतिम उमेदवार यादी जाहीर होण्यास अद्याप वेळ असल्याने प्रचार साहित्याच्या मोठ्या ऑर्डर अजून आल्या नाहीत, असे बहुतांश विक्रेत्यांनी सांगितले. उमेदवार निश्चित झाल्याशिवाय कोणताही पक्ष किंवा इच्छुक उमेदवार मोठ्या प्रमाणात प्रचार साहित्य छापण्याचा धोका पत्करत नाहीत.
जागावाटप कधी?
लालबागमधील प्रचार साहित्य व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे बंधू, महायुतीमधील जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. अनेक प्रभागांमध्ये उमेदवार निश्चित झाले नाहीत. अनेकांना धाकधूक आहे. त्यामुळे मागणी येत नाही. एकदा युती-आघाडीचा पेच सुटला, उमेदवार निश्चित झाले की साहित्य विक्रीला सुरुवात होईल, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.
चिंतेचे वातावरण
विशेष म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत प्रचार साहित्याची मागणी तुलनेने अधिक असते. प्रत्येक प्रभागात स्वतंत्र उमेदवार, स्थानिक प्रश्नांवर आधारित प्रचार आणि मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्ष जनसंपर्क मोहिमा राबवल्या जात असल्याने लालबागच्या बाजाराला मोठी चालना मिळते. मात्र, यंदा ही परिस्थिती अद्याप दिसून येत नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, अशी माहिती पारेख ब्रदर्स यांनी दिली.
सामाजिक माध्यमांचा आधार
पारंपरिक प्रचार साहित्याच्या तुलनेत अलीकडे सामाजिक माध्यमांवरील डिजिटल प्रचाराकडे उमेदवारांचा कल अधिक वाढला आहे. ही साहित्य विक्रेत्यांसाठी धोक्याची घंटा आहे. व्हिडिओ, रील्स, शॉर्ट क्लिप्स, ग्राफिक्स आणि व्हॉट्सअॅप संदेशांच्या माध्यमातून प्रचार करण्यावर अधिक भर दिला जात आहे. या माध्यमातून मतदारांपर्यंत कमी खर्चात, अधिक प्रभावीपणे वेगाने पोहोचता येते. त्यामुळे अनेक इच्छूक उमेदवारांनी डिजिटल प्रचाराला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे व्हिडिओ क्रिएटर, रील बनवणारे, समाजमाध्यमतज्ज्ञांची आणि डिजिटल प्रचार व्यवस्थापकांची मागणी वाढली आहे.
बदलते प्रचाराचे स्वरूप
एकीकडे लालबागचा पारंपरिक प्रचार साहित्य बाजार अंतिम निर्णयांच्या प्रतीक्षेत असताना, दुसरीकडे निवडणूक प्रचाराचे स्वरूप झपाट्याने बदलत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर बाजार पुन्हा गजबजेल, अशी आशा व्यापाऱ्यांना आहे. मात्र, डिजिटल प्रचाराच्या वाढत्या प्रभावामुळे भविष्यात या पारंपरिक व्यवसायासमोर नवी आव्हाने उभी राहणार, हेही तितकेच निश्चित आहे.
व्यवसायामध्ये घट
गेल्या १० वर्षांत निवडणूक प्रचार साहित्याचा व्यवसाय निम्म्याहून अधिक घटला आहे. प्रचाराचा मुख्य भर आता डिजिटल प्लॅटफॉर्मकडे वळताना दिसतो. पूर्वी प्रत्येक उमेदवार सरासरी १२ ते १५ लाख रुपये प्रचार साहित्यावर खर्च करत असे. मात्र, सध्या हा खर्च कमी होऊन सहा ते आठ लाखांपर्यंत आला आहे. निवडणूक खर्चाबाबत उमेदवारांसाठी ठरावीक मर्यादा असते; मात्र राजकीय पक्षांवर अशी कोणतीही मर्यादा लागू होत नाही.
पारंपरिक प्रचार
* टी-शर्ट, टोपी, बिल्ले, दुपट्टे
* झेंडे, बॅनर, पोस्टर, होर्डिंग
* पदयात्रा व सभांसाठी साहित्य
* तुलनेने जास्त खर्च, प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक
डिजिटल प्रचार
* सोशल मीडिया रील्स आणि व्हिडिओ
* व्हॉट्सअॅप प्रचार संदेश
* फेसबुक, इन्स्टाग्राम जाहिराती
* कमी खर्चात मोठी पोहोच
* व्हिडिओ क्रिएटर व समाजमाध्यमतज्ज्ञांची वाढती मागणी
उमेदवार यादी निश्चित होईपर्यंत कुणीही मोठी ऑर्डर देण्याचे धाडस पत्करत नाही. गेल्या निवडणुकांमध्ये या वेळी बाजार गजबजलेला होता. या वेळी शांतता आहे.
- श्रावण चौधरी,
श्री राम ड्रेसवाला
प्रत्येक प्रभागातून झेंडे, बॅनर, टी-शर्ट यांची मागणी असते. मात्र, यंदा जागावाटपाचा पेच आणि उमेदवारीचा तिढा सुटेपर्यंत ऑर्डर थांबलेल्या आहेत. निर्णय झाला की काम अचानक वाढेल, अशी अपेक्षा आहे.
- कृष्णा पुरोहित, महालक्ष्मी ट्रेडर्स
अलीकडे उमेदवार पोस्टर, बॅनर कमी आणि सोशल मीडियावर जास्त लक्ष देताना दिसतात. त्यामुळे पारंपरिक प्रचार साहित्याच्या व्यवसायावर थोडा परिणाम झाला आहे.
- नीलेश पटेल, राधे राधे ट्रेडर्स
प्रचार साहित्य व साधारण दर
बिल्ले / बॅज - २ ते ५० रुपये
दुपट्टे / मफलर - २० ते १०० रुपये
टी-शर्ट - ८० ते २५० रुपये
टोपी - ४० ते १२० रुपये
झेंडे - २० ते १५० रुपये
पोस्टर ५ ते ४० रुपये
बॅनर - १५ ते १२० रुपये प्रति चौ. फूट
हातातील फलक - ३० ते १५० रुपये
स्टिकर - २ ते १० रुपये
पत्रक १ ते ५ रुपये प्रति नग
कटआउट ८० ते २०० रुपये प्रति चौ. फूट
रिबीन ५ ते २० रुपये
सभा व पदयात्रांसाठी साहित्य (सेट) – ५,००० ते २५,००० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

