ठाण्यात ख्रिसमस सणासाठी रंगीबेरंगी केक आणि भेटवस्तूंचा बाजार बहरला
ठाण्यात ख्रिसमसचा उत्साह
रंगीबेरंगी केक आणि भेटवस्तूंच्या बाजारात मोठी रेलचेल; जीएसटी कपातीने ग्राहकांना दिलासा
ठाणे, ता. २४ (बातमीदार) : ख्रिसमस सणानिमित्त ठाण्यातील बाजारपेठा रंगीबेरंगी रोषणाई आणि विविध भेटवस्तूंनी गजबजून गेल्या आहेत. यंदा केकवरील १८ टक्के जीएसटी कमी झाल्याने किमतीत घट झाली असून, याचा थेट फायदा ग्राहकांना मिळत आहे. परिणामी, यंदा ख्रिसमसच्या आनंदात अधिकच भर पडली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पाचपाखाडी येथील ‘स्वीट काउंटी’ सारख्या नामांकित दुकानांमध्ये ख्रिसमससाठी खास केक तयार करण्यात आले आहेत. यात प्रामुख्याने सांता स्ट्रॉबेरी चॉकलेट, पायनॅपल, सांता डिलाइट, फॉलर फ्रुट आणि ख्रिसमस ट्री प्लम केक असे विविध चवींचे प्रकार आहेत. लहान मुलांसाठी ‘बेन्टो केक’ आणि कस्टमाइज्ड केकची मोठी मागणी आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार २२५ रुपयांपासून ते ७९९ रुपयांपर्यंत हे केक उपलब्ध आहेत. केक्ससोबतच यंदा ‘सिक्रेट सांता’ संकल्पनेसाठी खास गिफ्ट्स उपलब्ध आहेत. यात चॉकलेट हॅम्पर्स, चॉकलेट बुके, मॅजिक हॅम्पर बॉक्स आणि बोंबिलीनो यांसारख्या आकर्षक भेटवस्तूंनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘‘यंदा केकवरील जीएसटीमध्ये घट झाल्याने किमती कमी झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम असून, विविध प्रकारच्या केकला मोठी मागणी असल्याचे ठाण्यातील महिला व्यावसाययिकांनी सांगितले.
केक्सचे प्रकार किंमत (रुपये)
प्लम केक : १७५
सिक्रेट सांता चॉकलेट बुके : ६०० (मोठा) - २४५ (छोटा)
प्लम बार केक : १७५
सांता स्ट्रॉबेरी चॉकलेट केक : ३३५
सांता डीलाइट चॉकलेट केक : ३३५
पायनॅपल केक : ३३५
सिक्रेट सांता मॅजिक हॅम्पर बोक्स : ३००

