कल्याण–डोंबिवलीत महायुतीची गणिते अडचणीत

कल्याण–डोंबिवलीत महायुतीची गणिते अडचणीत

Published on

कल्याण-डोंबिवलीत महायुतीची गणिते अडचणीत
जागावाटपावरून भाजप-शिवसेना शिंदे गटात ताणतणाव
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २३ ः आगामी कल्याण-डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातील महायुतीच्या चर्चांना वेग आला असला, तरी जागावाटपाच्या मुद्द्यावरून दोन्ही पक्षांमध्ये मतभेद उफाळून आले आहेत. आज पार पडलेल्या बैठकीत पाच ते सहा प्रभागांवर एकमत न झाल्याने युतीबाबत कोणताही ठोस निर्णय होऊ शकलेला नाही. त्यामुळे हा विषय आता वरिष्ठ पातळीवर सोपवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत आतापर्यंत शिवसेना आणि भाजपची संयुक्त सत्ता राहिली असून, शिवसेना हा पक्ष मोठा भाऊ म्हणून ओळखला जात होता. मात्र, राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर आणि शिवसेना दुभंगल्यानंतर स्थानिक पातळीवरही त्याचे परिणाम दिसून येत आहेत. याचदरम्यान बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद निवडणुकांमध्ये भाजपने नगराध्यक्षपद मिळवत आपली ताकद वाढवली आहे. यामुळे पालिका निवडणुकीमध्येही भाजप अधिक आक्रमक भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, युती कायम राहणार की नाही, की जागावाटपात कोणता पक्ष वरचढ ठरणार, याकडे आता सर्वांचे लक्ष वरिष्ठ नेत्यांच्या निर्णयाकडे लागले आहे. वरिष्ठ पातळीवरील चर्चेनंतरच कल्याण-डोंबिवलीतील महायुतीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.

भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
विशेष म्हणजे डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण हे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर कल्याण-डोंबिवलीतील निवडणूक ही भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले असून, त्याचा थेट परिणाम युतीतील जागावाटपाच्या चर्चांवर होताना दिसत आहे. दुसरीकडे, शिवसेना (शिंदे गट) देखील आपल्या पारंपरिक प्रभावाच्या जागा सोडण्यास तयार नसल्याने दोन्ही पक्षांमधील ताणतणाव वाढला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com