जिल्ह्यात अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम

जिल्ह्यात अल्पसंख्यांक हक्क दिनानिमित्त विविध उपक्रम

Published on

जिल्ह्यात अल्पसंख्याक हक्कदिनानिमित्त विविध उपक्रम
शासनाच्या योजनांची माहिती; हक्क व कर्तव्यांबाबत जनजागृती
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण, समानता आणि सन्मान याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने जिल्ह्यात अल्पसंख्याक हक्कदिन विविध उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी (ता. १८) हा उपक्रम राबविण्यात आला. यानिमित्त अल्पसंख्याक आयोगामार्फत तसेच जिल्हा प्रशासनाच्या वतीने अल्पसंख्याक समाजासाठी शासनाने राबविलेल्या विविध योजना व उपक्रमांची माहिती विविध माध्यमांतून नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आली.
संयुक्त राष्ट्र संघाने १९९२ मध्ये अल्पसंख्यांकाच्या हक्कांबाबत जाहीर केलेल्या घोषणेनुसार दरवर्षी १८ डिसेंबर रोजी अल्पसंख्याक हक्कदिन साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व संबंधित विभागांच्या पुढाकाराने अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना त्यांच्या घटनात्मक हक्कांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. अल्पसंख्याक म्हणजे कोण, भारतीय संविधानात अल्पसंख्याकांसाठी कोणते हक्क व अधिकार दिले आहेत, तसेच त्यांची कर्तव्ये कोणती आहेत, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान भारताच्या संविधानातील कलम २९ आणि ३० नुसार अल्पसंख्यांकाना आपली भाषा, लिपी व संस्कृती जतन करण्याचा तसेच शैक्षणिक संस्था स्थापन व व्यवस्थापनाचा अधिकार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. यासोबतच धर्मस्वातंत्र्य, समान संधी, शिक्षणाचा अधिकार आणि शासकीय योजनांचा लाभ घेण्याचा हक्क याबाबतही सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच शासन अल्पसंख्याक समाजासाठी राबवित असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यामध्ये विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, वसतिगृह सुविधा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, पोलिस भरतीसाठी सहाय्य, संस्था व वैयक्तिक अनुदान योजना, कैद्यांसाठी पुनर्वसन उपक्रम तसेच सामाजिक एकात्मता वाढविण्यासाठीच्या योजनांचा समावेश होता. या योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक प्रक्रिया व कागदपत्रांची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com