उद्धव ठाकरे–राज ठाकरे एकत्र

उद्धव ठाकरे–राज ठाकरे एकत्र

Published on

ठाकरे युतीवर कल्याण-डोंबिवलीत कार्यकर्त्यांचा जल्लोष
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २४ ः आगामी पालिका निवडणुकींसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी युती जाहीर केली आहे. या निर्णायाचे स्वागत कल्याण-डोंबिवलीत ठाकरे गट आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात केले. या ऐतिहासिक घडामोडीचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून श्री गणेश मंदिरापर्यंत ढोल-ताशांच्या गजरात, घोषणा देत आणि भगवे ध्वज फडकावत मिरवणूक काढण्यात आली.
आगामी सर्व महापालिका निवडणुकांत मराठी माणसाचा, हिंदुत्वाचा भगवा फडकणार, असा ठाम विश्वास कार्यकर्त्यांनी या वेळी व्यक्त केला. आज महाराष्ट्राचे एक स्वप्न पूर्ण होत आहे. अनेक वर्षांपासून मराठी माणसाची अपेक्षा होती की ठाकरे बंधू एकत्र यावेत, अशी भावना कार्यकर्त्यांतून व्यक्त झाली. गद्दारी करून सत्तेत बसलेल्या लोकांचे राजकारण महाराष्ट्राला मान्य नसल्याचा सूरही या वेळी उमटला.
मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी या वेळी आक्रमक भूमिका मांडत सांगितले की, मराठी माणसाविरोधात इतर शक्ती एकत्र येत असतील, तर महापालिका निवडणुकांत मराठी माणूस आणि सर्व भाषिक नागरिक अधिक एकजुटीने उतरतील. फोडाफोडीचे, पळवापळवीचे राजकारण मराठी माणसालाच नव्हे तर इतर भाषिकांनाही मान्य नाही. पक्ष वाढवा, कार्यकर्ते घडवा, त्यांना संधी द्या; मात्र दुसऱ्यांची माणसे पळवून तिकीट देण्याचे राजकारण लोकांना पचलेले नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, या घडामोडींमुळे राज्याच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले असून, त्याचे पडसाद आगामी महापालिका निवडणुकांत कसे उमटतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्व पालिकांवर भगवा फडकवणार
मनोज घरत यांनी पुढे सांगितले की, महापालिका रणसंग्रामात सर्व भाषिक एकत्र उतरतील आणि सर्व महानगरपालिकांवर हिंदुत्वाचा भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाहीत. ठाकरे बंधूंच्या युतीमुळेच भाजप-शिंदे गटातही युतीच्या चर्चांना उधाण आले असून, ही ठाकरे ब्रँडचीच भीती असल्याचे त्यांनी नमूद केले. महापालिकांमध्ये वर्षानुवर्षे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर विश्वास ठेवून मतदान झाले आहे. उद्धव ठाकरे असोत किंवा राज ठाकरे, ठाकरेंनाच मतदान होते, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Marathi News Esakal
www.esakal.com