‘रोहा बदलतोय’ म्हणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखविली
‘रोहा बदलतोय’ म्हणाऱ्यांना मतदारांनी जागा दाखविली
खासदार सुनील तटकरेंचा आमदार दळवीसह विरोधकांना टोला
रोहा, ता. २४ (बातमीदार) : रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत नगराध्यक्षपदासह २० पैकी तब्बल १८ जागांवर एकहाती विजय मिळविला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला जवळपास पाच हजार मतांचे भरघोस मताधिक्य मिळाल्याने हा विजय अधिकच ठळक ठरला आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ‘रोहा बदलतोय’ अशी घोषणाबाजी करणाऱ्यांना रोहा-अष्टमीकर मतदारांनी त्यांच्या जागा दाखवून दिल्या असल्याचा सणसणीत टोला खासदार सुनील तटकरे यांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवी व अन्य विरोधकांना लगावला आहे.
नुकतेच खासदार सुनील तटकरे, राज्याच्या मंत्री आदिती तटकरे आणि माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांची भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीच्या समारोपप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या रोहा-अष्टमीकर जनतेशी संवाद साधताना खासदार तटकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी सर्व मतदार बंधू-भगिनींचे आभार मानत, रोहा शहराने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर विश्वासाची मोहोर उमटविल्याचे सांगितले. या वेळी माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, संतोष पोटफोडे, शहराध्यक्ष अमित उकडे, नवनिर्वाचित नगराध्यक्षा वनश्री शेडगे, सर्व विजयी नगरसेवक, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. २१ डिसेंबर रोजी रोहा-अष्टमी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. गेली सुमारे २५ वर्षे खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली रोहा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असून, हा किल्ला अजूनही अभेद्य असल्याचे या निकालातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. हा ऐतिहासिक विजय साजरा करण्यासाठी सोमवार (ता. २२) रोजी सायंकाळी ६.३० वाजता दमखाडी नाका येथील साई मंदिरापासून बाजारपेठ मार्गे राम मारुती चौकापर्यंत भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत नागरिक, व्यापारी आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सर्व रोहेकर बांधवांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसवर पुन्हा एकदा विश्वास दाखविल्याबद्दल खासदार तटकरे यांनी मतदारांचे मनःपूर्वक आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

