नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा
नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर भर द्यावा
‘सुशासन सप्ताह’ कार्यशाळेत जिल्हाधिकारी जावळे यांचे प्रतिपादन
अलिबाग, ता. २४ (वार्ताहर) ः माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या वतीने देशभरात ‘सुशासन सप्ताह’ साजरा केला जात असून, प्रशासनाने सर्वसामान्य जनतेसाठी प्रभावीपणे सेवा सुविधा पुरवून नागरिकांच्या समस्या सोडविण्यावर अधिक भर द्यावा, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिले. प्रशासन जनतेसाठी काय कार्य करते, याची माहिती थेट नागरिकांपर्यंत पोहोचविणे हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सुशासन सप्ताहाच्या अनुषंगाने मंगळवारी (ता. २३) जिल्हा नियोजन समिती सभागृहात ‘प्रशासन गाव की ओर-सुशासन’ या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हाधिकारी रायगड एच. के. जावळे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. रवींद्र शेळके तसेच विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना जिल्हाधिकारी किशन जावळे म्हणाले की, नागरिकांच्या तक्रारींचे वेळेत आणि प्रभावी निराकरण करणे हे प्रशासनाचे प्रमुख कर्तव्य आहे. त्यासाठी विशेष तक्रार निवारण शिबिरे आयोजित करावीत, सार्वजनिक तक्रारींचे तातडीने निर्गत करावे तसेच ऑनलाइन सेवांमध्ये होणारा विलंब टाळून सेवा वेळेत पुरवाव्यात. प्रत्येक अधिकाऱ्याने केलेल्या कामाची नोंद ठेवणे अत्यंत आवश्यक असून, त्यातून प्रशासनाची कार्यक्षमता अधिक प्रभावीपणे दिसून येते. ‘प्रशासन गाव की ओर’ ही संकल्पना अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकाभिमुख प्रशासन राबविण्याची उत्तम संधी असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रमुख पाहुणे माजी जिल्हाधिकारी एच. के. जावळे यांनी सांगितले की, केंद्र शासनाच्या प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागाच्या मार्गदर्शनानुसार सुशासन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात आदिवासी वाड्या व वस्त्यांची संख्या मोठी असून, आदिवासी विकास विभागाच्या माध्यमातून ‘संवाद सेतू’ उपक्रमाद्वारे त्यांच्या समस्या सोडविण्यावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

