भिलाड उड्डाणपुलाचे काम रखडले
भिलाड उड्डाणपुलाचे काम संथ गतीने
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सात किमीची कोंडी
तलासरी, ता. २४ (बातमीदार) : महाराष्ट्र-गुजरात सीमेवरील भिलाड येथे सुरू असलेल्या उड्डाणपुलाच्या कामातील दिरंगाईमुळे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडीने गंभीर रूप धारण केले आहे. या रखडलेल्या कामाचा थेट फटका महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याला बसत असून, मंगळवारी बुधवारी (ता. २४) तलासरी तालुक्यातील अच्छाडपर्यंत तब्बल सहा ते सात किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
भिलाड येथील उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक दिवसांपासून संथ गतीने सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक अत्यंत अरुंद मार्गावरून वळवण्यात आल्याने या महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. अवघ्या काही मिनिटांच्या प्रवासासाठी वाहनचालकांना दोन ते तीन तास अडकून राहावे लागत आहे. या कोंडीत रुग्णवाहिका अडकून पडत असल्याने रुग्णांच्या जिवाला धोका निर्माण होत आहे. तासनतास इंजिन सुरू ठेवावे लागत असल्याने इंधनाचे नुकसान होत असून, प्रवाशांना मानसिक मनस्ताप सहन करावा लागत आहे. वेळेवर पोहोचता येत नसल्याने कामगार आणि विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे.
दरम्यान, यासंबंधात वाहतूक विभागाशी संपर्क केला असता आमचे प्रयत्न सुरू असल्याचे विभागाने सांगितले.
-------------
प्रशासनाविरुद्ध संताप
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि संबंधित ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे ही स्थिती ओढवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. वारंवार तक्रारी करूनही ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने संताप व्यक्त होत आहे. भिलाड पुलाचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
-------------
उड्डाणपुलाचे काम हे संथ गतीने सुरू असल्या कारणामुळे आम्हा वाहनचालक, नागरिक यांना वाहतूक कोंडीला मोठ्या प्रमाणात सामोरे जाऊन नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीत अवजड वाहने अडकून पडल्याने आम्हा कारचालक यांना आमगाववरून वळसा घालून संजाणमार्गे तब्बल १५ किमी वळसा घालून भिल्लाड गाठावे लागते. इंधनासह वेळेचीदेखील खोटी होत आहे. त्यामुळे लवकर महामार्ग सुरळीत करावा.
- संतोष ठाकरे, वाहनचालक.

