एलबीएस मार्गावरील सिग्नल यंत्रणा बंद; वाहनचालकांना त्रास
एलबीएस मार्गावरील सिग्नल यंत्रणा बंद; वाहनचालकांना त्रास
धारावी, ता. २४ (बातमीदार) : कुर्ल्याच्या दिशेने सायन व धारावीकडे येणाऱ्या लाल बहादूर शास्त्री मार्गावरील (एलबीएस मार्ग) वाहतूक सिग्नल यंत्रणा गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
मध्य रेल्वेवरील सायन स्थानकासमोरील वाहतूक पुलाच्या नूतनीकरणासाठी हा पूल गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे कुर्ल्याहून येणारी तसेच कुर्ल्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक सायन-वांद्रे लूप मार्गावरून वळवण्यात आली आहे. परिणामी या मार्गावर सतत प्रचंड वाहतूक कोंडी होत असते. अशा परिस्थितीत सिग्नल यंत्रणा बंद असल्यामुळे वाहने वेगाने ये-जा करत असून, मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. मुंबई शहर तसेच पश्चिम व पूर्व उपनगरांना जोडणारा हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने, शहरातील प्रमुख रस्त्यांपैकी तो एक मानला जातो.
या रस्त्यावरून जड व हलक्या वाहनांची चोवीस तास वर्दळ असते. त्यामुळे एखादी दुर्दैवी अपघाताची घटना घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा सवाल उपस्थित केला जात आहे. वाहतूक विभागाकडून होत असलेल्या या अक्षम्य दुर्लक्षाबाबत नागरिकांत तीव्र संताप व्यक्त होत आहे. संबंधित वाहतूक विभागाने तातडीने दखल घेऊन एलबीएस मार्गावरील बंद असलेली सिग्नल यंत्रणा लवकरात लवकर सुरू करावी, अशी जोरदार मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

