‘ती’च्या हाती निवडणुकीची धुरा

‘ती’च्या हाती निवडणुकीची धुरा

Published on

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २४ : राज्यात महापालिका निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली आहे. तसेच उमेदवारी अर्ज वाटप प्रक्रिया सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या कामासाठी पालिका प्रशासन सज्ज झाले असून, १२ हजार ६५० अधिकारी आणि कर्मचारीवर्ग सज्ज ठेवण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक ६५ टक्के महिला कर्मचारी असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली. त्यामुळे ठाणे महापालिकेच्या निवडणुकीची धुरा ‘ती’च्या हाती असणार आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज होत विविध कामांना सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारांना मंगळवार (ता. २३) पासून उमेदवारी अर्जाचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. अशातच निवडणूक कामाची माहिती देण्यासाठी पालिकेच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात पत्रकार परिषद पार पडली. या वेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रशांत रोडे, उपायुक्त निवडणूक उमेश बिरारी, जी. जी. गोदेपुरे, मिताली संचेती, दीपक झिंजाड आदी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी सौरभ राव यांनी निवडणूक विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. या वेळी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ३१ डिसेंबरला अर्जांची छाननी केली जाणार असून, त्याच दिवशी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. उमेदवारी मागे घेण्याचा दिवस २ जानेवारी २०२६ असून, ३ जानेवारीला निवडणूक चिन्ह दिले जाणार आहे. याच दिवशी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

निवडणुकीच्या कामासाठी आवश्यक मनुष्यबळ सज्ज ठेवण्यात आले आहे. यामध्ये नऊ प्रभाग समितीनिहाय ११ निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी १, २, ३ यांची नेमणूक करण्यात आली आहे. ३३ प्रभागांत दोन हजार १३ मतदान केंद्रे असून, प्रत्येक ठिकाणी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी १, २, ३ आणि शिपाई असे पाच कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात येत आहेत. २० टक्के राखीव असे मिळून एकूण १२ हजार ६५० अधिकारी व कर्मचारी सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे या वर्गापैकी ६५ टक्के कर्मचारी हा महिलावर्ग असणार असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

३३ ठिकाणी सखी मतदान केंद्र
ठाणे महापालिका निवडणुकीसाठी ३३ प्रभागांत दोन हजार १३ मतदान केंद्रे असणार असून, प्रत्येक प्रभागात एक याप्रमाणे महिलांचे सखी मतदान केंद्र तयार करण्यात येणार आहे. दुसरीकडे ३३ आदर्श मतदान केंद्रे तयार करण्यात येणार असून, दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअर तसेच रॅम्पची सोय करण्यात आली आहे.

मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण
मतदान केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रथम प्रशिक्षण २७, २८ आणि २९ डिसेंबर या दिवशी राम गणेश गडकरी रंगायतन व डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे होणार आहे. दुसरे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या स्तरावर घेतले जाणार आहे.

एक खिडकी योजना
प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयामध्ये एक याप्रमाणे नऊ आणि ठाणे महापालिका मुख्यालयातील नागरी सुविधा केंद्र येथे एक अशा एकूण १० खिडक्या उघडण्यात आल्या असून, या एक खिडकी योजना येथून निवडणुकीसाठी आचारसंहिता कालावधीत उमेदवार, राजकीय पक्ष यांना सभा, प्रचाराकरिता सभेची परवानगी, सभा घेण्यासाठी मैदानाची परवानगी, ध्वनिक्षेपक परवानगी, रॅली, बोर्ड-बॅनर लावण्याची परवानगी, पक्ष कार्यालये उघडण्याची परवानगी, थकबाकी नसल्याचा दाखला, शौचालय वापर दाखला, ठेकेदार नसल्याचा दाखला, मतदार यादीचा उतारा आदी दाखले, प्रमाणपत्र व इतर परवानग्यांची मागणी, अग्निशमन विभाग, स्थानिक पोलिस ठाणे व वाहतूक विभाग या सर्व विभागांचे ना-हरकत दाखले उपलब्ध होणार आहेत.

झोननुसार साडेपाच हजार पोलिस बंदोबस्त
प्रत्येक झोननिहाय अंदाजे ५,५०० पोलिसांचा बंदोबस्त तैनात असेल. प्रत्येक मतदान केंद्र, संवेदनशील मतदान केंद्र, मतदान केंद्रापासून २०० मीटरवर पोलिस तैनात असणार आहे. प्रत्येक महसूल सेक्टर ठिकाणी एक पोलिस कर्मचारी तसेच पोलिसांचे जे सेक्टर असतील त्या ठिकाणी एक अधिकारी, चार कर्मचारी तसेच पोलिसांचे वाहन असेल. संवेदनशील ठिकाणी एसआरपी किंवा राज्य राखीव दल, पोलिस मित्र, एनएसएस, एनसीसीच्या विद्यार्थ्यांचा समावेश असणार आहे. प्रत्येक झोनमध्ये असणाऱ्या चेकनाक्यावर पोलिस बंदोबस्त असणार आहे. स्ट्राँग रूमच्या ठिकाणी एक अधिकारी, दोन कर्मचारी हे पाळीमध्ये बंदोबस्तासाठी असणार असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी नमूद केले.


अधिकारी आणि कर्मचारी १२,६५०
पोलिस बंदोबस्त ५,५००
मतदान केंद्रे २,०१३
आदर्श मतदान केंद्रे ३३

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com