तळोजा–खारघरमध्ये भाजपची प्रचारयंत्रणा सक्रिय

तळोजा–खारघरमध्ये भाजपची प्रचारयंत्रणा सक्रिय

Published on

तळोजा-खारघरमध्ये भाजपची प्रचारयंत्रणा सक्रिय
उमेदवार जवळपास निश्चित; मतदार भेटीगाठींना वेग
खारघर, ता. २४ (बातमीदार) : तळोजा आणि खारघर परिसराचा समावेश असलेल्या पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३ मध्ये भारतीय जनता पक्षाकडून प्रचारयंत्रणा कार्यरत होताना दिसत आहे. उमेदवारांची नावे जवळपास निश्चित झाल्यानंतर सोमवार रात्रीपासून इच्छुक उमेदवारांनी प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
या विस्तीर्ण प्रभागात तळोजा फेज-१ वसाहत, पेठालीगाव, भोईरपाडा, तळोजा गाव, पापडीचा पाडा, इनामपुरी, फरसीपाडा, कुटूकबांधन, ओवे गाव, ओवेकॅम्प, पेठगाव, रांजनपाडा, मुर्बी गाव तसेच खारघर सेक्टर २७ ते ४० मधील सिडको वसाहतींचा समावेश आहे. सुमारे ४७, ६२० मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात प्रत्येक मताला विशेष महत्त्व असून, थेंबे थेंबे तळे साचे, या न्यायाने पक्ष संघटन कामाला लागले आहे. भाजपकडून प्रीती फुलाजी ठाकूर, मंजुळा कातकरी, विनोद घरत आणि निर्दोष केणी ही चार नावे जवळपास निश्चित झाल्याचे पक्ष कार्यकर्त्यांकडून समजते. दुसरीकडे, महाविकास आघाडीकडून हरेश केणी आणि लीला कातकरी यांची नावे निश्चित असून उर्वरित दोन उमेदवारांबाबत चर्चा सुरू असल्याचे चित्र आहे.
पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे हरेश केणी, मंजुळा कातकरी, पापा पटेल आणि भारती चौधरी यांनी विजय मिळवला होता. मात्र, या वेळी भाजपने हा प्रभाग ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली आहे. विशेष बाब म्हणजे विनोद घरत आणि निर्दोष केणी यांनी गेल्या वर्षभरात नागरिकांच्या छोट्या-मोठ्या समस्या सोडवण्यावर भर दिला आहे. तसेच मंजुळा कातकरी यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने पक्षाला बळ मिळाले आहे. फुलाजी ठाकूर हे सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम राबवत असल्याने त्यांना जनमानसात चांगली ओळख आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com