उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का

Published on

उल्हासनगरमध्ये ठाकरे गटाला धक्का
जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे पत्नी-वाहिनीसह भाजपमध्ये
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) ः शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकत थेट भारतीय जनता पक्षात प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे या पक्षप्रवेशात त्यांच्यासोबत पत्नी वसुधा बोडारे, वाहिनी शीतल कदम-बोडारे, तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले. त्यामुळे ठाकरे गटाला हा केवळ एक नेता नव्हे तर संपूर्ण संघटनात्मक फटका मानला जात आहे.
वर्षानुवर्षे ठाकरे गटाचा आक्रमक ‘शिवसैनिक चेहरा’ म्हणून ओळखले जाणारे धनंजय बोडारे यांनी पत्नी-वाहिनी व कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. “विकास, स्थैर्य आणि प्रभावी नेतृत्वासाठी भाजप हाच पर्याय” असा स्पष्ट संदेश देत बोडारे यांनी आपली पुढील राजकीय दिशा ठरवली आहे.

मोठा निर्णय
उल्हासनगर, अंबरनाथ आणि कल्याण भागात गेली अनेक दशके सक्रिय असलेले धनंजय बोडारे हे ठाकरे गटातील महत्त्वाचे मराठी नेतृत्व मानले जात होते. माजी नगरसेवक, माजी उपमहापौर आणि माजी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी महापालिका पातळीवर आक्रमक भूमिका घेत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. मात्र, अलीकडील काळात पक्षांतर्गत निर्णय प्रक्रिया, स्थानिक राजकारणातील संधींची मर्यादा आणि भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत निर्माण झालेली अस्वस्थता यामुळे त्यांनी मोठा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

असंतोष समोर
भाजपत प्रवेश करताना बोडारे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “आजच्या घडीला विकासाची गती, प्रशासनाशी समन्वय आणि राजकीय स्थैर्य देण्याची क्षमता भाजपकडे आहे. उल्हासनगर-कल्याण भागातील रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी मला सक्षम व्यासपीठाची गरज होती. त्यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटातील असंतोष उघडपणे समोर आल्याचे चित्र आहे.

संघटनात्मक बदल
या पक्षप्रवेशाला केवळ वैयक्तिक निर्णय न मानता संघटनात्मक बदल म्हणून पाहिले जात आहे. कारण बोडारे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी वसुधा बोडारे, वाहिनी शीतल कदम आणि अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाकरे गटाच्या स्थानिक ताकदीला मोठा धक्का बसला आहे. विशेषतः उल्हासनगरमधील मराठी मतदारांमध्ये बोडारे यांचे असलेले नेटवर्क भाजपसाठी आगामी महापालिका आणि विधानसभा राजकारणात निर्णायक ठरू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com