जिल्ह्यात वराहपालन व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल
जिल्ह्यात वराहपालन व्यवसायातून कोट्यवधींची उलाढाल
शेतीपूरक व्यवसायातून समृद्धीकडे; तरुण शेतकऱ्यांसाठी नवा आर्थिक मार्ग
वाणगाव, ता. २७ (बातमीदार) : पालघर जिल्ह्यात बदलत्या हवामानामुळे शेती व्यवसायावर अनिश्चिततेचे सावट आहे. अवकाळी पाऊस, दुष्काळ, कीडरोग आणि उत्पादन खर्चातील वाढ यामुळे शेतकरी अडचणीत सापडत असताना, शेतीला पूरक आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर उत्पन्न देणारे पर्यायी व्यवसाय महत्त्वाचे ठरत आहेत. अशा परिस्थितीत पशुपालन, कुक्कुटपालन व शेळीपालनाच्या जोडीला आता वराहपालन हा व्यवसाय पालघर जिल्ह्यात वेगाने नावारूपास येत आहे. या व्यवसायातून वर्षाला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे.
वसई, पालघर, वाडा, तलासरी आणि डहाणू तालुक्यांत गटाच्या माध्यमातून तसेच स्वतंत्र स्वरूपात अनेक शेतकरी वराहपालन व्यवसायाकडे वळले आहेत. कमी खर्चात अधिक नफा देणारा हा व्यवसाय असल्याने शेतकरीवर्गात त्याबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. शेतीला जोडधंदा म्हणून वराहपालन सुरू केल्यास शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीला निश्चितच गती मिळू शकते, असे मत पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी व्यक्त केले. वराहपालन व्यवसायाचा प्रमुख फायदा म्हणजे खाद्यावरील कमी खर्च. हॉटेलमधील उष्टे अन्न, मेस, ढाबे, वसतिगृह, लग्नसमारंभातील उरलेले अन्न, तसेच भाजीपाला कचरा यांचा योग्य पद्धतीने वापर करून वराहांचे पोषण करता येते. यामुळे फॅटनिर्मिती वेगाने होत असून खर्च कमी आणि नफा अधिक मिळतो, अशी माहिती तलासरी येथील यशस्वी वराहपालक अनिकेत सोनवल यांनी दिली. जिल्ह्यात सध्या १०० ते १५० लहान-मोठे शेतकरी वराहपालन व्यवसायात सक्रिय असून, ‘लँडरेड’ व ‘ड्युरॉक्स’ या जातींच्या डुकरांचे संगोपन मोठ्या प्रमाणात केले जाते. स्थानिक पातळीवरही वराहाच्या मांसाला चांगली मागणी आहे. बोईसरमधील टॅप्स कॉलनी परिसर, तसेच वसई तालुक्यात ख्रिस्ती बांधवांची लोकसंख्या जास्त असल्याने येथे वराह मांसाचा मोठा बाजार आहे. ठरावीक दिवशी फार्मवरच कटाई केल्याने मांस खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसते.
......................
लाखोंचा निव्वळ नफा
वसई, मुंबई, पुणे, नाशिक तसेच पंचतारांकित हॉटेल्स आणि दक्षिण भारतात वराहाच्या मांसाला मोठी मागणी आहे. याशिवाय प्रक्रिया करून पॅकिंगद्वारे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही वराहाचे मांस पाठवले जाते. पालघर जिल्ह्यातून गोव्यासाठी दलालांमार्फत मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होत असल्याचे वराहपालक रवि सोनवल यांनी सांगितले. रवि सोनवल यांच्या मते, माझी वर्षाला सुमारे ३५ लाख रुपयांची उलाढाल होत असून, खर्च वजा करता सुमारे ३० लाखांचा निव्वळ नफा मिळतो. रोगराई व मृत्यूचे प्रमाण अत्यल्प असल्याने या व्यवसायात जोखीम फारशी नाही. वराहपालनाबाबत पशुसंवर्धन विभागाकडून ‘क्लासिकल स्वाईन फिव्हर’सारख्या आजारांवर नियमित लसीकरण केले जाते. त्यामुळे व्यवसाय सुरक्षित राहतो. नोकरीपेक्षा अधिक उत्पन्न देणारा हा व्यवसाय असल्याने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी नियोजनबद्ध वराहपालन सुरू करावे, असे आवाहन पशुधन विकास अधिकारी डॉ. राहुल संखे यांनी केले आहे.
.........................
वराहपालन : महत्त्वाची आकडेवारी
जिल्ह्यातील वराहपालक : अंदाजे १०० ते १५०
गर्भधारणा कालावधी : ११४ दिवस
मादी वर्षातून दोनदा पिल्लांना जन्म देते
एका वेळी पिल्ले : ८ ते १२
विक्री कालावधी : ६ ते ७ महिने
सरासरी वजन : ८० ते ९० किलो
किलोचा दर : सुमारे २५० रुपये
एका वराहापासून उत्पन्न : २० ते २२ हजार रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

