मुंबईच्या रेल्वेला नवे बळ!
मुंबईच्या रेल्वेला नवे बळ!
१८ हजार ३६४ कोटींचे ४०० किमी रेल्वे प्रकल्प; गर्दी, विलंब आणि प्रवासी त्रासावर उतारा
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २८ : मुंबईची उपनगरी रेल्वेव्यवस्था येत्या काही वर्षांत आमूलाग्र बदलणार आहे. वाढती प्रवासीसंख्या, लोकलमधील प्रचंड गर्दी आणि वारंवार होणारा विलंब या समस्यांवर उपाय म्हणून मध्य व पश्चिम रेल्वेकडून १८ हजार ३६४.९४ कोटी रुपयांचे तब्बल ४००.५३ किलोमीटर लांबीचे विविध रेल्वे प्रकल्प राबवले जात आहेत. हे प्रकल्प आगामी काही वर्षांत पूर्ण होणार असून, त्यामुळे उपनगरी लोकल तसेच मेल-एक्स्प्रेस गाड्यांची संख्या आणि वेळपालनात सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. परिणामी मुंबईकरांचा दैनंदिन प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे.
मुंबईची उपनगरी रेल्वेसेवा सीएसएमटी ते कर्जत-खोपोली, कसारा, पनवेल, वांद्रे, ठाणे-पनवेल तसेच नेरूळ-बेलापूर ते उरणपर्यंत विस्तारलेली आहे. या मार्गांवर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर नेरूळ-उरण मार्गावर १० नव्या लोकल सेवा सुरू करण्यात आल्या असून, तरघर आणि गव्हाण ही दोन नवी स्थानकेही कार्यान्वित करण्यात आली आहेत.
मध्य रेल्वेवर क्षमतेत मोठी वाढ
सीएसएमटी-कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, पनवेल-कर्जत उपनगरी कॉरिडॉर, कल्याण-आसनगाव चौथा मार्ग, कल्याण-बदलापूर तसेच बदलापूर-कर्जत अतिरिक्त मार्ग आणि ऐरोली-कळवा उन्नत लिंक या प्रकल्पांमुळे मध्य रेल्वेची मार्गक्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. या कामांमुळे नव्या लोकल फेऱ्या सुरू करणे शक्य होईल, गाड्यांमधील गर्दी कमी होईल आणि वेळपालनात सुधारणा होईल. विशेषतः बदलापूर-कर्जत मार्ग हा मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे प्रवास अधिक सुलभ होण्यासोबतच मालवाहतुकीला गती आणि पर्यावरणीय लाभही मिळणार आहेत.
पश्चिम रेल्वेवरही दिलासा
मुंबई सेंट्रल-बोरिवली सहावा मार्ग, गोरेगाव-बोरिवली हार्बर मार्गिका, बोरिवली-विरार पाचवा व सहावा मार्ग आणि विरार-डहाणू अतिरिक्त मार्गामुळे पश्चिम रेल्वेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. त्यामुळे विरारपलीकडील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून, मुख्य आणि उपनगरी गाड्यांचे स्पष्ट विभाजन करणे शक्य होणार आहे. रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, हे सर्व प्रकल्प टप्प्याटप्प्याने पूर्ण झाल्यानंतर मुंबई उपनगरी रेल्वेचा चेहरामोहरा बदलणार असून प्रवाशांचा दैनंदिन प्रवास अधिक विश्वासार्ह होईल.
एकूण लांबी : ४००.५३ किमी
एकूण खर्च : १८,३६४.९४ कोटी
मध्य रेल्वे मार्गावरील प्रकल्प
१) सीएसएमटी-कुर्ला पाचवा-सहावा मार्ग
- लांबी : १७.५ किमी
- खर्च : ८९१ कोटी
- सुरुवात : २०१९
* सद्य:स्थिती :
- पहिला टप्पा : परळ - कुर्ला (१०.१ किमी)
- पूर्ण होण्याची अंतिम तारीख : डिसेंबर २०२५
- दुसरा टप्पा : परळ-सीएसएमटी (७.४ किमी)
२)पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे
- लांबी : २९.६ किमी
- खर्च : २,७८२ कोटी
- सुरुवात : २०१९
* सद्य:स्थिती : बोगदा व पूल बांधणी सुरू
- पूर्ण होण्याची अंतिम तारीख : डिसेंबर २०२५
३) ऐरोली-कलवा एलिव्हेटेड मार्ग
- लाबी : ३.३ किमी
- खर्च : ३,५७८ कोटी
- सुरुवात : २०१८
* सद्य:स्थिती :
- पहिला टप्पा : दिघा गाव स्थानक आणि पूल बांधणी पूर्ण
- दुसरा टप्पा : जमीन संपादन व पुनर्वसन प्रगतिपथावर आहे. सुमारे ६० टक्के काम पूर्ण झाले आहे.
- पूर्ण होण्याची अंतिम तारीख : डिसेंबर २०२६
४) कल्याण-आसनगाव चौथा मार्ग
- लांबी : ३२ किमी
- खर्च : १,७५९ कोटी
- सुरुवात : २०१९
* सद्य:स्थिती : जमिनीचे अधिग्रहणाचे काम सुरू.
पूर्ण होण्याची अंतिम तारीख : डिसेंबर २०२६
५) कल्याण-बदलापूर तिसरा - चौथा मार्ग
- लांबी : १४.०५ किमी
- खर्च : १,५१० कोटी
- सुरुवात : २०१९
* सद्य:स्थिती : युटिलिटी शिफ्टिंग, मातीचे काम व पूल बांधणी सुरू
- पूर्ण होण्याची अंतिम तारीख : डिसेंबर २०२५
६) कल्याण - कसारा तिसरा मार्ग
- लांबी : ६७.३५ किमी
- खर्च : ७९२.८९ कोटी
- सुरुवात : २०२१
* सद्य:स्थिती : सध्या ५० टक्के काम पूर्ण
- पहिला टप्पा-आसनगाव ते कसारा
- दुसरा टप्पा-कल्याणे ते आसनगाव
- पूर्ण होण्याची अंतिम तारीख : डिसेंबर २०२६ पर्यंत होण्याची अपेक्षा
७) निळजे-कोपर डबल कॉर्ड लाइन
- लांबी : ५ किमी
- खर्च : ३३८ कोटी
- सुरुवात : २०१९
* सद्य:स्थिती : काम प्रगतिपथावर
- अंतिम तारीख : २०२६ पर्यंत होण्याची अपेक्षा
८) बदलापूर - कर्जत तिसरा - चौथा मार्ग
- लांबी : ६४ किमी
- खर्च : १,३२४ कोटी
- मध्य रेल्वेचा प्रकल्प, मार्गावर सहा स्थानके, रेल्वे आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात ५०-५० टक्के भागीदारी
९) आसनगाव-कसारा चौथा मार्ग
- लांबी : ३५ किमी
- खर्च : ७३७.८५ कोटी
पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रकल्प
१) मुंबई सेंट्रल - बोरिवली सहावा मार्ग
- लांबी : ३० किमी
- खर्च : ९१९ कोटी
- सुरुवात : २०१८
* सद्य:स्थिती :
कांदिवली-बोरिवली (३.२१ किमी)
पूर्ण होण्याची अंतिम तारीख : जानेवारी २०२६
२) गोरेगाव-बोरिवली हार्बर लाइन विस्तार
- लांबी : ७ किमी
- खर्च : ८९८ कोटी
- सुरुवात : २०१९
- सद्य:स्थिती : जमीन संपादन प्रक्रिया सुरू
- गोरेगाव-मालाड विभागाचे काम मार्च २०२८
- मालाड-बोरिवली विभागाचे काम डिसेंबर २०२८
३) बोरिवली - विरार पाचवा-सहावा मार्ग
- लांबी : २६ किमी
- खर्च : २,१८४ कोटी
- सुरुवात : २०१९
- सद्यस्थिती : ४७ रेल्वे रचना शिफ्टिंग चालू
- बुकिंग ऑफिसेस, टॉयलेट ब्लॉक्स इत्यादी हटवण्याचे काम सुरू आहे.
- पूर्ण होण्याची अंतिम तारीख : मार्च २०२८
४) विरार-डहाणू रोड तिसरा - चौथा मार्ग
- लांबी : ६५ किमी
- खर्च : ३,५८७ कोटी
- सुरुवात : २०१८
* सद्य:स्थिती : मातीचे काम व पूल बांधणी सुरू
- पूर्ण होण्याची अंतिम तारीख : डिसेंबर २०२६
५) नायगाव-जूचंद्र डबल कॉर्ड लाईन
- लांबी : ६ किमी
- खर्च : १७६ कोटी
- सुरुवात : २०२२
* सद्य:स्थिती : काम प्रगतिपथावर
- अंतिम तारीख : मार्च २०२८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

