‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ उद्यानाची सुरक्षा केवळ ५ रक्षकांवर
‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ उद्यानाची सुरक्षा केवळ पाच रक्षकांवर
सुरक्षा रक्षक वाढवण्याची नागरिकांची मागणी; तुटलेल्या रेलिंग, दुर्गंधीवर तोडगा काढण्याचे आवाहन
बेलापूर, ता. २५ (बातमीदार) : नेरूळ परिसरासह संपूर्ण नवी मुंबईच्या सौंदर्यात भर घालणारे ‘ज्वेल ऑफ नवी मुंबई’ उद्यान सध्या विविध समस्यांनी ग्रासले असून, अपुऱ्या सुरक्षेमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. सुरुवातीच्या काळात उद्यानाच्या सुरक्षा व व्यवस्थापनासाठी नवी मुंबई महापालिकेकडून २५ ते ३० सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. मात्र सध्या कंत्राटी पद्धतीमुळे ही संख्या घटून केवळ पाच सुरक्षा रक्षकांवर आली आहे. एवढ्या मोठ्या व गर्दीच्या उद्यानाची सुरक्षा इतक्या कमी मनुष्यबळावर अवलंबून असल्याने गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
दररोज सकाळ-संध्याकाळी हजारो नागरिक चालणे, योगा, व्यायाम व विरंगुळ्यासाठी या उद्यानात येतात. मात्र सुरक्षा रक्षकांच्या कमतरतेचा गैरफायदा घेत गर्दुल्ल्यांची घुसखोरी, दिवसाढवळ्या प्रेमीयुगुलांचे गैरप्रकार, जॉगिंग ट्रॅकवर दुचाकींचे बिनधास्त पार्किंग तसेच नशेत उद्यानातील सुविधांची तोडफोड होत असल्याचे चित्र आहे. उद्यानाच्या अनेक ठिकाणी रेलिंग तुटल्याने प्रवेश-निर्गमनावर कोणतेही नियंत्रण उरलेले नाही. त्यामुळे असामाजिक घटकांना मोकळे रान मिळाले आहे.
याशिवाय उद्यानात जागोजागी रेलिंग तुटलेली असून, कचऱ्याचे डबे मोडकळीस आले आहेत. जॉगिंग ट्रॅक व आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या ‘सुंदर उद्यान’ या संकल्पनेला आणि नागरिकांच्या सुखसोयींना त्यामुळे गालबोट लागत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
कोट
ज्वेल ऑफ नवी मुंबई उद्यानात तातडीने सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवून नियमित पेट्रोलिंग व्यवस्था लागू करणे, तुटलेली रेलिंग दुरुस्त करणे व स्वच्छतेची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे. ‘नागरिकांना सुरक्षित व सुविधासंपन्न उद्यान मिळावे, यासाठी महापालिकेने ठोस उपाययोजना कराव्यात.
- समीर पवार, नागरिक

