नेरूळ येथे सोसायटीत वाचनालय
नेरूळ येथे सोसायटीत वाचनालय
नेरूळ, ता. २७ (बातमीदार) : नेरूळ सेक्टर दोन येथील दत्तात्रय सोसायटीत ख्रिसमसच्या मुहूर्तावर वाचनालयाचा आरंभ करण्यात आला. सोसायटीतील रहिवाशांमध्ये वाचनाची आवड वाढावी तसेच मोबाईलवर वाढलेल्या अवलंबनातून मुक्तता मिळावी, या उद्देशाने नव्याने निवडून आलेल्या कार्यकारिणीने हा समाजोपयोगी उपक्रम राबविला आहे. कामगार नेते तथा नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र सावंत यांच्या हस्ते वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात बहुतांश वेळ मोबाईलवर खर्च होत असताना वाचन संस्कृती जपण्यासाठी वाचनालय सुरू करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सोसायटीतील रहिवाशांनी कार्यकारिणीचे स्वागत केले. या वाचनालयामध्ये मराठी व इंग्रजी भाषेतील विविध दैनिके आणि वृत्तपत्रे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या वेळी सोसायटीचे पदाधिकारी नलावडे, साळुंखे, प्रवीण साबळे यांनी नवीन वृत्तपत्रांच्या पेटीस पुष्पहार अर्पण केला. कार्यक्रमाला सोसायटीचे माजी अध्यक्ष अमोल पार्ले, माजी खजिनदार चव्हाण, सावंत, बोराडे यांच्यासह अनेक रहिवासी उपस्थित होते. या उपक्रमामुळे सोसायटीत वाचनाची चळवळ अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

