रिक्षा चालकांची बेशिस्ती

रिक्षा चालकांची बेशिस्ती

Published on

रिक्षाचालकांची बेशिस्त
कांदिवलीत भाडे मिळवण्यासाठी अस्ताव्यस्त पार्किंग

कांदिवली, ता. २७ (बातमीदार) : कांदिवली पश्चिम येथील रेल्वे पुलालगत तसेच इतर मार्गांवर ये-जा करणारे रिक्षाचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत आहेत. भाडे मिळविण्यासाठी चक्क पायऱ्यांना खेटूनच आडव्यातिडव्या रिक्षा पार्क केल्या जातात. तसेच शेअर रिक्षा थांब्यावर दुहेरी रांगा लावल्या जातात. त्याचा त्रास रेल्वे प्रवाशांसह बेस्ट बसला वळण घेताना होत आहे. अशा रिक्षाचालकांवर कारवाईची मागणी प्रवासी करीत आहेत.
कांदिवली एसव्ही रोड येथून नारायण जोशी एकदिशा अरुंद मार्ग स्टेशनकडे जातो. या मार्गाच्या नूतनीकरणासाठी खोदकाम सुरू आहे. त्रिकामदास मार्ग आणि वसनजी लालजी हा एकदिशा मार्ग स्टेशनकडून पश्चिमेला जातो. या मार्गावर विविध राजकीय पक्षांचे रिक्षा थांबे आहेत. या थांब्यांवरील रिक्षाचालक लवकर भाडे मिळविण्यासाठी चक्क पायऱ्यांना खेटूनच आडव्यातिडव्या रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे तिकिटासाठी जाणाऱ्या तसेच ये-जा करणाऱ्या प्रवाशांना, विशेष करून ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो. स्टेशनपासून एमजी रोडकडे जाणाऱ्या मार्गाच्या कोपऱ्यावरील थांब्यावर शेअर रिक्षाच्या दुहेरी रांगा लागतात. त्यामुळे बसचालकांना वळण घेताना रिक्षा बाजूला होण्याची वाट पाहावी लागते. तसेच बसच्या मागे वाहनांची कोंडी होते.
कांदिवली वाहतूक विभागामार्फत परिसरात सातत्याने गस्त घातली जाते. बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई केली जाते. काही रिक्षाचालक पोलिसांची गाडी दिसताच पळ काढतात, असे कांदिवली वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीशकुमार राऊत यांनी सांगितले.


बेशिस्त रिक्षाचालक वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत दादागिरी करतात. त्यांच्यावर संबंधित विभागाकडून कठोर कारवाई केली जात नाही. नव्या वर्षात तरी अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईची अपेक्षा आहे.
- मनोज गिरीधर, रेल्वे प्रवासी

Marathi News Esakal
www.esakal.com