वांगणी येथे मोफत आरोग्य शिबिर
बदलापूर, ता. २७ (बातमीदार) : वांगणी येथील अमन कॉम्प्लेक्स सोसायटीतील रहिवाशांनी एकत्र येत सामाजिक बांधिलकीचा आदर्श घालून दिला आहे. सोसायटीमध्ये राहणारा आर्यन राजू साळवे याचा अवघ्या १३व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले होते. त्याच्या स्मरणार्थ सोसायटी आणि साळवे परिवाराच्या विद्यमाने शनिवारी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. बदलापूर येथील श्री समर्थ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे सल्लागार डॉ. अश्विन चरखा (एम.डी. आय.एस.एम.) यांच्या मार्गदर्शनाखाली मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन तसेच ऑक्सिजन पातळीची मोफत तपासणी करण्यात आली. सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत पार पडलेल्या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. शिबिरात प्रक्षाळे दातांचा दवाखाना यांच्या माध्यमातून दंत तपासणी व तज्ज्ञ सल्ला देण्यात आला. ‘आशुआदू फाउंडेशन’च्या वतीने नेत्र तपासणी शिबिर करून अल्प दरात चष्म्यांचे वितरण करण्यात आले.

