सोशल मीडियावर टिटवाळ्याची ‘डिजिटल जंगल सफारी’
टिटवाळा रेल्वे स्थानकावर वाघ?
एआयच्या फोटोने भीतीचे वातावरण
टिटवाळा, ता. २९ (वार्ताहर) ः टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात वाघ दिसल्याचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल होताच काही काळासाठी परिसरात एकच खळबळ उडाली होती. विशेषतः व्हॉट्सॲप ग्रुपवर वेगाने पसरलेल्या या फोटोमुळे खरंच टिटवाळ्यात वाघ आला का? असा प्रश्न नागरिकांच्या मनात निर्माण झाला. मात्र, काही वेळातच या फोटोमागील सत्य उघड झाले.
रात्रीच्या वेळी स्थानकाच्या पाटीसमोर उभ्या असलेल्या वाघाचा हा फोटो इतका वास्तवदर्शी होता की, अनेकांनी क्षणाचाही विलंब न लावता तो पुढे पाठवला. अलीकडच्या काळात मानवी वस्तीत वन्यप्राण्यांच्या शिरकावाच्या घटनांमुळे आधीच असलेली भीती या फोटोमुळे अधिकच तीव्र झाली. मात्र, काही वेळातच या फोटोमागील सत्य उघड झाले. हा फोटो प्रत्यक्ष नसून आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि फोटो एडिटिंग तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
फोटोचे सत्य उघड होताच भीतीचे रूपांतर मनोरंजनात झाले. वाघ, हत्ती, टार्झनचे फोटो एआयच्या मदतीने बनवून ते व्हायरल करण्यात आले. यावर रेल्वे स्थानक की जंगल सफारी?, आता जंगल बुकचा सीन पूर्ण करा, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी फोटोवर दिल्या आहेत.
दरम्यान, टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात वाघ, हत्ती किंवा अन्य कोणत्याही वन्यप्राण्याचा शिरकाव झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाज माध्यमांवर व्हायरल होणाऱ्या फोटो किंवा संदेशांवर त्वरित विश्वास न ठेवता, माहितीची खात्री अधिकृत स्रोतांकडून करून घ्यावी, असे आवाहन सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे.

