प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना ‘चतुरंग’चा अभिमानमूर्ती सन्मान प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना ‘चतुरंग’चा अभिमानमूर्ती सन्मान प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना ‘चतुरंग’चा अभिमानमूर्ती सन्मान
अश्विनी भिडे यांना ‘अभिमानमूर्ती’ सन्मान
चतुरंग प्रतिष्ठानतर्फे गौरव
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २८ ः मुंबई महानगरात मेट्रो मार्गांचे जाळे उभारण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि ‘मेट्रो वूमन’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सचिव अश्विनी भिडे यांना डोंबिवली येथे चतुरंग प्रतिष्ठानतर्फे ‘अभिमानमूर्ती’ सन्मानाने गौरविण्यात आले. चतुरंगच्या रंगसंमेलनात लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर यांच्या हस्ते मानपत्र व सन्मानचिन्ह देऊन अश्विनी भिडे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर लेखिका श्रद्धा कुलकर्णी उपस्थित होत्या.
सन्मान स्वीकारताना अश्विनी भिडे म्हणाल्या, मुंबई महानगर क्षेत्रात मेट्रो मार्ग उभारणे हे अत्यंत अवघड आणि आव्हानात्मक काम होते. हे काम एका व्यक्तीने नव्हे, तर हजारो जणांच्या सामूहिक प्रयत्नातून पूर्ण झाले. त्यामुळे हा सन्मान मी त्या संपूर्ण गटसमूहाचा मानते. आपण कोणताही सन्मान मिळावा या उद्देशाने कधीच काम केले नाही. समोर आलेले काम समाजहिताचे आहे, या प्रशासकीय दृष्टिकोनातूनच प्रत्येक जबाबदारी पार पाडली, असे त्यांनी नमूद केले.
गतीमान नवीन तंत्रज्ञानाने जीवनाचे अर्थ बदलून टाकले असल्याचे सांगत त्या म्हणाल्या, मी इंग्रजी साहित्याची अभ्यासक आहे. बांधकाम, तंत्रज्ञान अशा मूलभूत सुविधांच्या क्षेत्रातील थेट ज्ञान नसतानाही प्रशासकीय कौशल्य, उत्तम सहकारी, मार्गदर्शक, आई-वडील आणि कुटुंबातून मिळालेले संस्कार, मित्रपरिवाराचे साहाय्य यामुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाची घडण झाली. त्यातूनच काम करण्याची उर्मी मिळत गेली. चतुरंग प्रतिष्ठानने आपल्या कामाची दखल घेऊन या सन्मानासाठी निवड केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी बोलताना लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राजेंद्र निंभोरकर म्हणाले, उच्च प्रशासकीय पदावर कार्यरत असतानाही जमिनीवर पाय रोवून ठेवणाऱ्या अश्विनी भिडे यांच्या कार्यकौशल्याची, बुद्धिमत्तेची, काम करण्याच्या धडाडीची, समर्पित भावनेची आणि शिस्तप्रियतेची नव्या पिढीने प्रेरणा घेणे आवश्यक आहे. अवघड आणि आव्हानात्मक परिस्थितीत एक महिला सनदी अधिकारी किती दमदारपणे काम करून दाखवू शकते, याचे उत्तम उदाहरण आहे.
प्रत्येक दिवस नवे शिकण्याचे संधीक्षण
सनदी सेवेत आल्यानंतर नवनवीन विषय आणि त्यातून काम करण्याच्या संधी मिळाल्या. अवघड, आव्हानात्मक परिस्थितींवर संयमाने आणि सकारात्मकतेने मात कशी करायची, याचे धडे मिळाले. नवीन विषय, भौगोलिक परिस्थिती आणि समाजमन यांचा बारकाईने अभ्यास करता आला. या शिकण्यातूनच प्रशासकीय चौकटीत राहून समाजहित आणि विकासाची अनेक कामे करता आली, असेही भिडे यांनी सांगितले. माझा कामाचा प्रत्येक दिवस म्हणजे नवे शिकण्याचे आणि काम करण्याचे एक नवे संधीक्षण असते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

