तलासरीत ‘धूमस्टाइल’ ठरत आहे तरुणाईसाठी जीवघेणी

तलासरीत ‘धूमस्टाइल’ ठरत आहे तरुणाईसाठी जीवघेणी

Published on

वर्षभरात अपघातांत ४८ जणांचा मृत्यू
तलासरीत धूमस्टाइल ठरतेय जीवघेणी; पोलिसांचे प्रबोधन व कडक कारवाई मोहीम
तलासरी, ता. २८ (बातमीदार) : तालुक्यात तरुणाईमध्ये वाढलेली धूमस्टाइल दुचाकी चालवण्याची क्रेझ आता त्यांच्याच जीवावर उठली आहे. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून भरधाव वाहने चालवण्याच्या नादात गेल्या एका वर्षात तब्बल ४८ जणांना आपला प्राण गमवावा लागला आहे. वाढत्या अपघातांमुळे तालुक्यात भीतीचे वातावरण असून, पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
तलासरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत ४६ भीषण अपघातांची नोंद झाली आहे. यामध्ये ४८ नागरिकांचा मृत्यू झाला असून, अनेक जण कायमचे अपंग झाले आहेत. ही अधिकृत आकडेवारी असून, नोंद न झालेले किरकोळ अपघात यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे.
तालुक्यात दुचाकीवर तीन जण बसवून फिरणे आणि अल्पवयीन मुलांच्या हातात महागड्या गाड्या असणे हे चित्र सर्रास दिसत आहे. विशेषतः शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात सुटण्याच्या वेळी हे तरुण भरधाव वेगाने गाड्या पळवतात. यामुळे विद्यार्थी आणि पादचाऱ्यांचा जीव धोक्यात येत आहे. अनेक तरुणांनी आपल्या दुचाकींचे मूळ सायलेन्सर काढून त्यात फेरबदल केले आहेत. यामुळे होणाऱ्या प्रचंड आवाजामुळे ध्वनिप्रदूषण वाढत असून, रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा त्रास होत आहे. अशा सायलेन्सरवर तातडीने बंदी घालून कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्‍यान, वाहतुकीचे नियम पाळणे हे स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे. भरधाव वेग आणि सायलेन्सर फेरबदल करणाऱ्या दुचाकीस्वारांवर आमची कारवाई अधिक तीव्र करण्यात येईल, अशी माहिती तलासरी पोलिस प्रशासनाने दिली आहे.
------------------
पालकांचे दुर्लक्ष भोवतेय
मुलांच्या हट्टापायी पालक त्यांना वेगाने चालणाऱ्या दुचाकी घेऊन देतात, मात्र त्यांना नियमांचे भान देत नाहीत. परिणामी अपघातानंतर संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळत आहे. पालकांनी मुलांच्या अशा जीवघेण्या छंदाला वेळीच आवर घालणे गरजेचे आहे.
------------------
पोलिसांची धडक मोहीम
अपघातांची मालिका रोखण्यासाठी तलासरी पोलिसांनी आता कडक पावले उचलली आहेत. प्रबोधनासोबतच दंडात्मक कारवाईवर भर दिला जात आहे. गेल्या १५ दिवसांत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या १० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
------------------
तलासरी भागात अपघातांचे प्रमाण चिंताजनक आहे. त्यामुळे वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असून, नियमबाह्य वाहन चालविणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. पालकांनी अल्पवयीन मुलांच्या हाती वाहने देऊ नयेत.
- अजय गोरड, पोलिस निरीक्षक, तलासरी पोलिस ठाणे

Marathi News Esakal
www.esakal.com