अंड्यांचे दर पाच वर्षांच्या उच्चांकावर
वाशी, ता. २८ (बातमीदार) : नवी मुंबई परिसरात अंड्यांचे दर पाच वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहोचले असून याचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. सध्या घाऊक बाजारात अंड्यांचा दर सात ते साडेसात रुपये प्रति अंडे असून किरकोळ विक्रीत एका अंड्यासाठी आठ ते साडेआठ रुपये मोजावे लागत आहेत. थंडीच्या हंगामात वाढलेली मागणी, कोंबडी पालनाच्या खर्चात झालेली वाढ, खाद्यधान्यांच्या दरातील चढउतार आणि वाहतूक खर्च यामुळे अंड्यांचे दर सातत्याने वाढत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.
नवी मुंबईतील वाशी, नेरूळ, बेलापूर, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर अंड्यांची खरेदी-विक्री होते. हॉटेल्स, ढाबे, बेकरी, कॅन्टीन, तसेच जिम आणि प्रथिने आहार घेणाऱ्या नागरिकांकडून अंड्यांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे; मात्र उत्पादन खर्च वाढल्याने अपेक्षित प्रमाणात पुरवठा होत नसल्याने मागणी आणि पुरवठ्यातील तफावत निर्माण झाली आहे.
अंड्यांच्या दरवाढीचा सर्वाधिक फटका नवी मुंबईतील हॉटेल आणि बेकरी व्यावसायिकांना बसत असून अनेकांनी अंड्यावर आधारित पदार्थांचे दर वाढवले आहेत. काही ठिकाणी ऑम्लेट, अंडा भुर्जी, केक, पेस्ट्री यांचे दर वाढले असून ग्राहकांवर त्याचा आर्थिक भार पडत आहे. अंडी हा मुख्य कच्चा माल असल्याने खर्च वाढला असून दर वाढवणे अपरिहार्य झाले आहे, असे घणसोली येथील व्यावसायिकाने सांगितले.
मटण, चिकनही महागले
थंडीमुळे मटण आणि चिकनलाही मागणी वाढली आहे. त्यामुळे मटण व चिकनचे दरदेखील वाढले आहेत. सध्या मटण ८०० ते ८५० रुपये प्रतिकिलोने विक्री होत असून, चिकन २४० ते २६० रुपये किलोने विकले जात आहे.
थंडी वाढल्याने अंड्यांची मागणी दुपटीने वाढली आहे, त्यामुळे दरही वाढले आहेत. गेल्या पाच वर्षांतील हे उच्चांकी दर आहेत.
- शुभम येडे, अंडीविक्रेते
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

