मृत्यूनंतरही जपली माणुसकी
मृत्यूनंतरही जपली माणुसकी
ठाण्यातील महिलेच्या अवयवदानाने सहा रुग्णांना जीवदान
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २८ : दु:खाचा डोंगर कोसळलेला असतानाही ठाण्यातील एका कुटुंबाने घेतलेल्या धाडसी आणि संवेदनशील निर्णयामुळे सहा रुग्णांना नवे आयुष्य मिळाले. मेंदूमृत (ब्रेन डेड) घोषित झालेल्या ३८ वर्षीय महिलेच्या अवयवदानातून एकाच वेळी सहा जणांचे प्राण वाचले. संपूर्ण अवयव दानाची ठाण्यातील ही पहिलीच घटना ठरली असून, तिचे अवयव ठाणे, मुंबई आणि दिल्लीतील रुग्णालयांमध्ये यशस्वीरीत्या प्रत्यारोपित करण्यात आले.
हाजुरी येथील रहिवासी असलेल्या या महिलेला मेंदूत रक्तस्राव झाल्याने १९ डिसेंबर रोजी हाजुरी येथील महावीर जैन ट्रस्ट संचलित महावीर जैन हॉस्पिटल व प्रताप आशर कार्डियाक सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी (ता. २५) डॉक्टरांनी तिला ‘ब्रेन डेड’ घोषित केले. या कठीण क्षणी डॉक्टरांनी अवयवदानाचे महत्त्व कुटुंबीयांना समजावून सांगितले. आपल्या भावनांवर संयम ठेवत कुटुंबीयांनी समाजहिताला प्राधान्य देत अवयवदानाचा निर्णय घेतला.
२६ डिसेंबर रोजी डॉ. विनीत रणवीर आणि त्यांच्या टीमने अवयव काढण्याची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. यामध्ये यकृत, दोन मूत्रपिंड (किडनी), हृदय, स्वादुपिंड आणि फुफ्फुस असे सहा महत्त्वाचे अवयव दान करण्यात आले. पोलिसांच्या मदतीने ‘ग्रीन कॉरिडॉर’ उभारण्यात आला. ठाण्याहून पवईपर्यंत हृदय अवघ्या १७ मिनिटांत पोहोचवून एका रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले. पाच अवयव मुंबईतील रुग्णांना, तर एक अवयव ठाण्यातील रुग्णाला देण्यात आला.
नऊ वर्षांच्या मुलीसाठी आधार
या उदात्त कार्याच्या सन्मानार्थ जैन ट्रस्ट आणि महावीर जैन हॉस्पिटलतर्फे महिलेच्या नऊ वर्षांच्या मुलीच्या भविष्यासाठी प्रत्येकी एक लाख रुपये, अशी एकूण दोन लाख रुपयांची मुदत ठेव (एफडी) देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली. यावेळी हॉस्पिटलचे विश्वस्त महेश राजदरेकर, दीपक भेदा, भरत मेहता तसेच रुग्णालयाची वैद्यकीय टीम उपस्थित होती.
जनजागृती आवश्यक
ब्रेन डेड घोषित झाल्यानंतर ठराविक वेळेत अवयवदान होणे अत्यावश्यक असते. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती वाढल्यास अनेक गरजूंचे प्राण वाचू शकतात, असे प्रतिपादन डॉ. विनीत रणवीर यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

