वसईचा तरुण मिळवतोय परदेशी सरकारकडून स्टार्ट-अप फंडिंग

वसईचा तरुण मिळवतोय परदेशी सरकारकडून स्टार्ट-अप फंडिंग

Published on

वसईच्या सुपुत्राची फिनलंडमध्ये गरुडभरारी
स्टार्टअपसाठी परदेशी सरकारकडून चार कोटींचे फंडिंग; पाच युरोपियन विद्यापीठांना मार्गदर्शन
विरार, ता. २९ (बातमीदार) : वसईच्या मातीतील गुणवत्तेचा डंका आता सातासमुद्रापार युरोपमध्ये गाजत आहे. वसई तालुक्यातील वडवली पाली येथील डॉ. टायरॉन मच्याडो यांनी आपल्या ‘सेन्सर कॅलिब्रेशन’ या स्टार्टअपसाठी फिनलंड सरकारच्या ‘बिसिनेस फिनलंड’ या उपक्रमाकडून तब्बल चार कोटी रुपयांच्या निधीची मान्यता मिळवली आहे. केवळ निधीच नव्हे, तर डॉ. टायरॉन सध्या पाच युरोपियन विद्यापीठांना मार्गदर्शन करत असून, एका महत्त्वाच्या प्रकल्पाचे नेतृत्वही करत आहेत.
डॉ. टायरॉन यांनी त्यांच्या पीएचडी संशोधनावर आधारित ‘प्रोजेक्ट पिच’ सादर केली होती. स्वायत्त मोबाईल मशिन्स आणि त्यांच्या सेन्सर कॅलिब्रेशनसाठी (कॅमेरे, लिडार, रडार, IMU आदी) त्यांनी विकसित केलेल्या व्यवसाय धोरणांची दखल घेत फिन्निश सरकारने या प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवला आहे. २०३२ पर्यंत या क्षेत्रातील बाजारपेठेचा कल आणि तंत्रज्ञान यावर ते सध्या प्रोजेक्ट हेड म्हणून काम पाहत आहेत.
डॉ. टायरॉन यांचा शैक्षणिक प्रवास थक्क करणारा आहे. मुंबईच्या डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनीरिंगमधून पहिल्या वर्गातील बी. ई. मेकॅनिकल ही पदवी घेतल्यानंतर डॉ. टायरॉन यांनी चाल्मर्स युनिव्हर्सिटी, गॉथेनबर्ग, स्वीडन येथून एम. एस.-प्रोडक्शन इंजिनिअरिंग पहिल्या वर्गात उत्तीर्ण केले. त्यानंतर युरोपियन युनियनच्या प्रतिष्ठित अशा मारी-क्युरी फाउंडेशनच्या बहुउद्देशीय पीएचडीला प्रवेश मिळवून प्रथम जर्मनीमध्ये, बॉश, लिबहेर आणि कामाग या नामांकित अभियांत्रिकी समूहांबरोबर संशोधन केले. नंतर फिनलंड मधील ताम्परे युनिव्हर्सिटीमधून २०२४ मध्ये त्यांनी डॉक्टर ऑफ सायन्स (ऑटोमेशन सायन्स अँड इंजिनीरिंग) ही पदवी प्राप्त केली.
डॉ. टायरॉन हे वसईतील कला, लेखन आणि बँकिंग क्षेत्रातील सुपरिचित दीपक मच्याडो आणि अर्सला मच्याडो यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल वसई-विरार परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत असून, जागतिक स्तरावर भारतीय बुद्धिमत्तेची मोहोर त्यांनी उमटवली आहे.

आंतरराष्ट्रीय स्तरावर नेतृत्व
सध्या डॉ. टायरॉन ताम्परे युनिव्हर्सिटीमध्ये ''पोस्ट डॉक्टरल रिसर्चर'' म्हणून कार्यरत आहेत. ''SUSTAINLIVWORK'' या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात चार लिथुआनियन आणि एक जर्मन विद्यापीठाच्या सहकार्याने नवीन ''सेंटर ऑफ एक्सलन्स'' स्थापन करण्यासाठी ते नेतृत्व करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com