उमेदवारांकडून कार्यकर्त्यांसाठी थर्टी फर्स्टची पार्टी
खारघर, ता. २९ (बातमीदार) : पालिका निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून उमेदवार निवडीची अंतिम यादी जवळपास पूर्ण झाली आहे. नावे निश्चित झालेल्या उमेदवारांना पक्ष श्रेष्ठींकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे उमेदवारी दाखल करून कार्यकर्त्यांसाठी थर्टी फर्स्ट पार्टीसाठी जोरदार तयारी केल्याचे समजते.
पनवेल महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १ आणि २ हा ग्रामीण परिसर, तर प्रभाग क्रमांक ३ ते ६ मध्ये काही गावे आणि तळोजा व खारघर वसाहतीचा समावेश होतो. विशेष म्हणजे या सहाही प्रभागात शेकाप, काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत होणार आहे. त्यामुळे थर्टी फर्स्ट पार्टीच्या पार्श्वभूमीवर संबंधित उमेदवारांकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे आणि अर्ज छाननी ३१ तारीख आहे. २ जानेवारीला अर्ज माघारी घेण्याची तारीख आहे.
३ जानेवारीपासून सर्वच पक्षांकडून प्रचार सुरू होणार आहे. त्यापूर्वी कार्यकर्त्यांना रिचार्ज करण्यासाठी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी योग्य दिवस असल्यामुळे उमेदवारांकडून पनवेल परिसरात असलेल्या फॉर्म हाऊस, तसेच काही निवडक धाब्यांची तयारी केल्याची समजले. शहरी भागात आठ ते दहा कार्यकर्त्यांनी आपल्या ओळखीच्या जागी पार्टीची तयारी केल्यास उमेदवारांकडून देखभाल आणि त्यासाठी लागणाऱ्या खर्चासाठी काही निवडक कार्यकर्त्यांकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या दिवशी एकादशी असल्यामुळे घरी वाद टाळण्यासाठी बहुतांश कार्यकर्त्यांनी काही फॉर्महाऊस आणि धाब्यांवर होणाऱ्या पार्टीला पसंदी दिल्याचे समजते.
अवैध मद्य विक्रेत्यांकडून तयारी पूर्ण
खारघर परिसरातील गावांत मोठ्या प्रमाणात अवैधपणे दारू विक्री केली जाते. विशेष म्हणजे परिसरातील गावांत कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. कामगारांकडून वर्षाचा अखेरचा दिवस उत्साहात साजरा केला जात असल्यामुळे अवैध दारू विक्रेत्यांनी साठा करून ठेवल्याचे समजले.

