रिपब्लिकन प्रतिनिधी महापालिकेत पाठवणार

रिपब्लिकन प्रतिनिधी महापालिकेत पाठवणार

Published on

नवी मुंबई, ता. २९ (वार्ताहर) : आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीत फुले, शाहू, आंबेडकर विचारधारेचा प्रतिनिधी लोकशाही मार्गाने महापालिकेत पाठवण्याचा निर्धार आंबेडकरी व रिपब्लिकन संघटनांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. महापालिका क्षेत्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, कायदेशीर, युवक, तसेच आंबेडकरी महिला संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक रविवारी (ता. २८) सीबीडी बेलापूर येथे पार पडली.

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ विचारवंत डॉ. जी. के. डोंगरगावकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीस महापालिकेच्या सर्व प्रभागांतून ५६ हून अधिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत १९९५ पासून आजपर्यंत झालेल्या निवडणुकांमधील आंबेडकरी कार्यकर्ते व मतदारांच्या भूमिकेवर चर्चा झाली. आंबेडकरी चळवळीचे राजकीय अस्तित्व महापालिकेत अपेक्षेप्रमाणे उभे राहू न शकल्याची खंत अनेक वक्त्यांनी व्यक्त केली. बेलापूर व ऐरोली मतदारसंघात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मतदान करूनही आंबेडकरी विचारांचे प्रतिनिधी महापालिकेत पाठवण्यात अपयश आले, याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

झोपडपट्टी पुनर्विकास, महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा, कंत्राटी कामगारांचे प्रश्न, विकासकामांत आंबेडकरी कार्यकर्त्यांचा सहभाग, झोपड्यांचा मालकी हक्क, बौद्ध विहारांचे नियमन, तसेच विशेष घटक अनुसूचित जाती-जमाती योजनेच्या निधीच्या योग्य वापरावर सखोल विचारमंथन झाले. मागील निवडणुकांत राखीव जागांवर निवडून आलेल्या काही नगरसेवकांनी अपेक्षित कामगिरी न केल्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

समन्वय समितीची स्थापन
प्रत्येक प्रभागात आंबेडकरी पक्षांतील फूट टाळून ‘एकास एक-एक उमेदवार’ या तत्त्वावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व आंबेडकरी गटांमध्ये कायमस्वरूपी एकोपा निर्माण करण्यासाठी ‘रिपब्लिक फेडरेशन-नवी मुंबई’ स्थापन करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच निवडणुकीसाठी धोरण व रणनीती ठरवण्यासाठी आंबेडकरी राजकीय रणनीती समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात डॉ. जी. के. डोंगरगावकर, प्रा. व्यंकट माने, मीरा गायकवाड, पल्लवी शिंदे, गौतम रसाळ, चंद्रकांत जगताप, मिलन कांबळे, सुरेश कोरे व दिलीप जाधव यांचा समावेश आहे.

भ्रष्टाचारमुक्त निवडणुकांसाठी पुढाकार
निवडणुका पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त पार पडाव्यात, यासाठी भ्रष्टाचार प्रतिबंध व तक्रार समिती स्थापन करण्यात आली आहे. यामध्ये सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, माजी सैनिक, वकील व तरुणांचा सहभाग असणार आहे. ॲड. राजरत्न डोंगरगावकर व चंद्रकांत सोनावणे यांची प्रमुख निमंत्रक म्हणून निवड करण्यात आली.

Marathi News Esakal
www.esakal.com