अनेक ठिकाणी डंम्पिंग ग्राउंड
‘कचरा वर्गीकरण’चा नवा नियम वादाच्या भोवऱ्यात
ठाकरे गट आक्रमक, आंदोलनाचा इशारा
कल्याण, ता. २९ (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महापालिकेने शून्य कचरा मोहीम राबविताना आता साप्ताहिक वारानुसार कचऱ्याचे वर्गीकरण करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे अनेक सोसायट्यांमध्ये डम्पिंग ग्राउंड तयार होतील, असे सांगत शिवसेनेचे उपनेते विजय साळवी यांनी हे आदेश त्वरित बदलण्याची मागणी केली आहे.
महापालिकेच्या नव्या आदेशानुसार शून्य कचरा मोहिमेत सोमवारी प्लॅस्टिक बाटल्या व इतर, मंगळवारी कापड, बुधवारी कागद व पुठ्ठा, गुरुवारी प्लॅस्टिक भंगार, शुक्रवारी ई-वेस्ट-थर्माकॉल रबर, शनिवारी काचेच्या वस्तू, रविवारी कागदी पुठ्ठा अशा प्रकारे कचरा संकलित केला जाणार आहे. या आदेशामुळे गृहनिर्माण संस्था, चाळी वगैरे भागातील नागरिकांना कचऱ्यांचे वर्गीकरण करावे लागणार आहे. असे केल्यास प्रत्येक ठिकाणी छोटे डम्पिंग ग्राउंड तयार होण्याची भीती उपनेते विजय साळवी यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी ओला व सुका कचरा वेगळा देण्याबाबतचे आदेश होते, त्याप्रमाणे दिला जात होता. आता सुका कचरा आठवडाभर साठवून आठवड्याच्या वारानुसार द्यावा लागणार आहे. याचाच अर्थ ठेकेदाराचे अर्धे काम गृहनिर्माण संस्थांना करावे लागणार आहे. या आदेशाप्रमाणे पुढील काळात सोसायट्यांनी आपला कचरा सोसायटीतच जाळून विल्हेवाट लावावी, असेही आदेश निघू शकतात. एकीकडे कचरा उचलण्यासाठी महापालिकेला विशेष करही द्यायचा आणि कचरा आठवडाभर साचवून ठेवायचा हे अन्यायी धोरण आहे. हा आदेश महापालिकेने त्वरित रद्द न केल्यास ठाकरे पक्षातर्फे मोठे आंदोलन करण्याचा इशारा उपनेते विजय साळवी यांनी दिला आहे.

