जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचले महाविस्ताराचे तंत्रज्ञान
२२ हजार शेतकऱ्यांची तंत्रज्ञानाकडे ओढ
पालघरमध्ये ‘महाविस्तार एआय’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एका क्लिकवर शेतीविषयक सर्व समस्यांचे निराकरण
वाणगाव, ता. २९ (बातमीदार) : शेतकऱ्यांच्या शेतीविषयक अडचणी आणि प्रश्नांवर रामबाण उपाय म्हणून महाराष्ट्र शासनाने विकसित केलेले ‘महाविस्तार एआय’ ॲप पालघर जिल्ह्यात लोकप्रिय होत आहे. कृषी विभागाच्या जनजागृती मोहिमेमुळे जिल्ह्यातील आतापर्यंत २१ हजार ९२९ शेतकऱ्यांनी हे ॲप्लिकेशन डाऊनलोड केले असून, याद्वारे शेतकरी आता अधिक आधुनिक व तांत्रिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या पुढाकाराने तयार झालेल्या या ॲपमध्ये कृषी विद्यापीठे, भारतीय हवामान विभाग, मत्स्य विभाग, पशुसंवर्धन आणि पाणी फाउंडेशन यांसारख्या नामवंत संस्थांची खात्रीशीर माहिती उपलब्ध आहे. यात प्रामुख्याने पीक सल्ला, मृद परीक्षणानुसार खतांचा वापर, कीड-रोग नियंत्रण आणि बाजारभावाची माहिती मिळते. या ॲपचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील ‘एआय टॅब.’ शेतकरी आपला प्रश्न बोलून किंवा लिहून विचारू शकतात, ज्याचे उत्तर हे ॲप तत्काळ देते. सोबतच माहितीचा अधिकृत स्रोतही सांगते, ज्यामुळे माहितीच्या अचूकतेची हमी मिळते. पिकासाठी आवश्यक खतांचे अचूक नियोजन, शासकीय योजनांसाठी घरबसल्या मोबाईलवरून अर्ज करण्याची सुविधा तसेच विविध व्हिडिओंच्या माध्यमातून आधुनिक शेतीचे प्रशिक्षण यामध्ये उपलब्ध असल्यामुळे शेतकऱ्यांचे काम अधिक सुलभ होण्यास मदत मिळणार आहे.
जिल्ह्यातील सहाय्यक आणि उपकृषी अधिकारी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनीही या सुविधेचा लाभ घेऊन आपली शेती समस्यामुक्त करावी, असे आवाहन जिल्हा कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे.
------------------
एआय महाविस्तार ॲप्लीकेशन डाऊनलोड संख्या
तालुका - शेतकरीसंख्या
पालघर - ३,९१८
वसई - १,९४४
डहाणू - ३,०८१
तलासरी - १,९३७
वाडा - ३,१५७
विक्रमगड - १,७२८
जव्हार - ३,६०५
मोखाडा - २,५५९
एकूण - २१,९२९
------------------
मोबाईलमधील महाविस्तार एआय ॲप्लिकेशन म्हणजे शेतकऱ्यांचा खिशातील पॉकेट मित्र. यामुळे तत्काळ शेतीच्या पूर्वमशागतीपासून ते काढणीपश्चात मार्केटिंगपर्यंतची इत्थंभूत माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमध्ये महाविस्तार एआय ॲप्लिकेशन डाऊनलोड करावे.
- नीलेश भागेश्वर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, पालघर

