विकासकामांना भिवंडीकरांची साथ

विकासकामांना भिवंडीकरांची साथ

Published on

भिवंडी, ता. २९ (वार्ताहर) : गलिच्छ, अस्वच्छ आणि नियोजनाअभावी नेहमीच दुर्लक्षित राहिलेल्या भिवंडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासनाने हाती घेतलेल्या कोणत्याही विकासकामांना भिवंडीकर नक्कीच साथ देतील, असा विश्वास प्रॅक्टिसिंग आर्किटेक्चर इंजिनिअर्स असोसिएशनचे भिवंडी शहर सचिव जावेद आजमी यांनी व्यक्त केला. शहर स्वच्छ, सुंदर आणि विकसित व्हावे, ही प्रत्येक नागरिकाचीच अपेक्षा असून यासाठी प्रशासन व नागरिकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात सध्या वेगाने सुरू असलेल्या रस्ते रुंदीकरण कामांबाबत आयुक्त अनमोल सागर यांचे अभिनंदन करत, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी असोसिएशन प्रशासनासोबत असल्याचे आजमी यांनी स्पष्ट केले. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष जलाल अन्सारी, दुर्राज कामणकर, के. बी. मराठे, मधुसूदन मायकल, मंदार लेले, फिरोज शेख आदी अभियंते उपस्थित होते. भिवंडी शहरात वाढलेली अनधिकृत बांधकामे, धोकादायक इमारती, अरुंद रस्ते आणि सततची वाहतूक कोंडी या समस्या अतिशय गंभीर बनल्या आहेत. त्यात आता मेट्रो प्रकल्पासह कोट्यवधी रुपयांची विकासकामे शहरात सुरू होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भिवंडीचा नियोजनबद्ध विकास होणे अत्यावश्यक आहे, असे मत आजमी यांनी व्यक्त केले. शहरातील उड्डाणपूल अवजड वाहनांसाठी बंद असल्याने त्यांचा अपेक्षित उपयोग होत नसल्याने त्यांच्या वापराबाबत पुनर्मूल्यांकन करणे गरजेचे असल्याचे मतही मांडण्यात आले.

कोंडीला रिंग रोडचा तोडगा
शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी प्रस्तावित रिंग रोड आणि प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण ही काळाची गरज आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर वाढलेल्या गोदामांची संख्या आणि त्यांना मिळालेला आंतरराष्ट्रीय दर्जा लक्षात घेता समृद्धी महामार्ग, विरार–अलिबाग कॉरिडॉर, वडोदरा कॉरिडॉर, बुलेट ट्रेन आणि मेट्रो प्रकल्पांमुळे भिवंडीची कनेक्टिव्हिटी वाढत आहे. मात्र, शहराबाहेरील रिंग रोड तयार झाल्यास अवजड वाहनांची शहरातून होणारी वर्दळ कमी होऊन अपघात आणि वाहतूक कोंडी टाळता येईल, असे मत आजमी यांनी व्यक्त केले.

रस्ते रुंदीकरण आवश्यक
शहरांतर्गत रस्ते रुंदीकरणाबाबत नदी नाका ते अंजूर फाटा रोड, स्व. आनंद दिघे चौक ते मंडई, जुना ठाणे रोड ते धामणकर नाका या भागांतील रस्ते अत्यंत अरुंद असून ते तातडीने रुंद करण्याची गरज आहे. हे काम करताना बाधित मालमत्ताधारकांना योग्य नुकसानभरपाई आणि पुनर्वसन देणे अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गावठाण क्षेत्रात तीनपट तर बिगर गावठाण क्षेत्रात दोनपट चटई क्षेत्र दिले जाणार असल्याने नागरिकांनीही या विकास प्रक्रियेला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन करण्यात आले.

पार्किंग व्यवस्था गरजेची
सध्या इलेक्ट्रिक बस सेवा सुरू होत असताना बस स्थानके, मेट्रो स्थानके आणि वर्दळीच्या ठिकाणी पुरेशी पार्किंग व्यवस्था निर्माण करणे आवश्यक असून त्यासाठी सुनियोजित आराखडा तयार करण्याची गरज असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com