बालअपहरणाचा व्हिडीओ व्हायरल

बालअपहरणाचा व्हिडीओ व्हायरल

Published on

अंबरनाथ, ता. २९ (वार्ताहर) : शहरात दोन लहान मुले अचानक बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर बालअपहरणाची अफवा वेगाने पसरली. समाज माध्यमांवर व्हिडिओ व फोटो व्हायरल झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांच्या सखोल तपासात ही घटना केवळ गैरसमजातून घडल्याचे स्पष्ट झाले असून, संबंधित दोन्ही मुले सुखरूप घरी परतली आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांनी दिली.
खुंटवली-खामकरवाडी परिसरात शुक्रवारी रात्री घराबाहेर खेळत असलेली गौतम चौहान (८) आणि कार्तिक चौहान (१०) ही दोन मुले अचानक दिसेनाशी झाल्याने परिसरात खळबळ उडाली. याच भागात काही दिवसांपूर्वी बालचोरीच्या संशयावरून दोन अज्ञात महिलांना नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिल्याची घटना घडली होती. त्यामुळे या दोन्ही मुलांच्या बेपत्ता होण्यामागे बालचोरांचा हात असावा, असा संशय व्यक्त होत अफवा आगीसारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. मुलांच्या घराबाहेर नागरिकांची मोठी गर्दी झाली. समाज माध्यम आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर मुलांचे फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणात पोलिसांनी बालअपहरणाचा आरोप फेटाळून लावला आहे. नागरिकांनी संयम राखत सतर्क राहावे व अफवांऐवजी अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे, कायदा हातात घेऊ नये आणि कोणतीही संशयास्पद बाब आढळल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

मुले झोपली रिक्षात
मुलांची आई बबिता चौहान यांनी सांगितले की, खेळता-खेळता मुले जवळ उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षात जाऊन झोपली होती. रिक्षाला पडदा असल्यामुळे आत मुले असल्याचे कोणाच्याही लक्षात आले नाही आणि त्यातून गैरसमज निर्माण झाला. शनिवारी पहाटे सुमारे अडीचच्या सुमारास दोन्ही मुले घरी परतली.

पालेगावात संशयित
अंबरनाथ शहरातील विविध भागांतून मुले चोरी होत असल्याच्या संशयावरून नागरिकांकडून संशयितांना पकडल्याचे काही व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. अशीच एक घटना अंबरनाथ पूर्वेतील पालेगाव परिसरात घडली. बाजारात घरगुती साहित्य खरेदीसाठी आलेल्या महिलेचे लहान बाळ एका व्यक्तीने उचलल्याचा संशय नागरिकांना आला. संतप्त नागरिकांनी संबंधित व्यक्तीला पकडून मारहाण केली आणि शिवाजीनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Marathi News Esakal
www.esakal.com