थर्टी फर्स्ट व नववर्षानिमित्त पर्यटकांची गर्दी; सीमा भागात वाहनांची कडेकोट तपासणी
सीमेवर वाहनांची कसून तपासणी
‘थर्टी फर्स्ट’साठी पर्यटकांच्या गर्दीत वाढ; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस सज्ज
कासा, ता. २९ (बातमीदार) : सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पालघर जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मांदियाळी सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज झाले असून, महाराष्ट्र-गुजरात सीमेसह महत्त्वाच्या नाक्यांवर वाहनांची कडेकोट तपासणी सुरू करण्यात आली आहे.
पालघर जिल्ह्यातील डहाणू आणि तलासरी हे तालुके गुजरात राज्याच्या सीमेला लागून असल्याने या भागात विशेष खबरदारी घेतली जात आहे. दापसरी जकात नाका, चारोटी टोल नाका, सायवन नाका आणि चारोटी कोस्टल रोड यांसारख्या प्रमुख मार्गांवर पोलिसांनी तपासणी केंद्रे उभारली आहेत. गुजरातवरून येणाऱ्या आणि मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या प्रत्येक संशयित वाहनाची झडती घेतली जात आहे. नववर्षाच्या पार्ट्यांच्या निमित्ताने होणारी अवैध मद्य वाहतूक आणि अंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके तैनात केली आहेत. रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्यात आली असून, महामार्गावर ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावून संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.
------------------
‘ड्रंक अँड ड्राइव्ह’वर कठोर कारवाई
पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ (मद्यपान करून वाहन चालवणे) विरोधात मोठी मोहीम राबवण्यात येत आहे. मद्यपान करून गोंधळ घालणारे आणि वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या पर्यटकांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सुरक्षित प्रवासासाठी वाहनचालकांनी वेगावर मर्यादा ठेवावी आणि पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

