जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्रास शासनाची मान्यता
जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्रास शासनाची मान्यता
‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत पाच खेळांना प्राधान्य
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : रायगड जिल्ह्यातील उदयोन्मुख क्रीडापटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर घडवण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, ‘मिशन लक्ष्यवेध’ या योजनेअंतर्गत जिल्ह्यात क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता दिली आहे. या केंद्रामध्ये टेबल टेनिस, कुस्ती, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स आणि शूटिंग या पाच खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील खेळाडूंनी ऑलिम्पिक व जागतिक स्पर्धांमध्ये यश संपादन करावे, या उद्देशाने शासनाने क्रीडा प्रशिक्षणासाठी त्रिस्तरीय रचना उभारली आहे. राज्यस्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभागीय स्तरावर स्पोर्ट्स एक्सलन्स सेंटर आणि जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र स्थापन करण्यात येत असून, रायगड जिल्ह्यातील हे केंद्र त्याच धोरणाचा भाग आहे.
प्रत्येक खेळासाठी २० खेळाडूंची निवड करण्यात येणार असून, हे केंद्र अनिवासी स्वरूपाचे राहणार आहे. निवडलेल्या खेळाडूंना तज्ज्ञ क्रीडा मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण देण्यात येईल. अत्याधुनिक क्रीडा साहित्य, स्पोर्ट्स किट, पूरक आहार, स्पर्धा खर्च, वैद्यकीय सुविधा, विमा, समुपदेशन तसेच सराव व लीग स्पर्धांचे आयोजन अशा सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
खेळाडूंची निवड जिल्हा, विभाग व राज्य स्तरावरील कामगिरीनुसार टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून, जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्राचा सविस्तर आराखडा लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
चौकट
इच्छुक क्रीडा मार्गदर्शकांना आवाहन
ॲथलेटिक्स, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कुस्ती व शूटिंग या खेळांसाठी इच्छुक व पात्र क्रीडा मार्गदर्शकांनी आवश्यक शैक्षणिक व क्रीडा प्रमाणपत्रांसह ३१ डिसेंबरपर्यंत संबंधित कार्यालयात अर्ज सादर करावेत. तसेच या खेळांचे प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यास इच्छुक केंद्रप्रमुखांनीही आवश्यक माहितीसह अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

