भाजपच्या मतपेढीवर शिवसेनेचा डोळा
भाजपच्या मतपेढीवर शिवसेनेचा डोळा
अनेक उत्तर भारतीय नेते शिंदेसेनेत
भाईंदर, ता. २९ (बातमीदार) : मिरा-भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपची हक्काची मतपेढी मानल्या जाणाऱ्या उत्तर भारतीय आणि राजस्थानी मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी शिवसेनेने (शिंदे गट) कंबर कसली असून, ‘सोशल इंजिनिअरिंग’चा आधार घेत भाजपच्या अनेक मातब्बर नेत्यांना पक्षात सामील करून घेतले आहे.
मिरा-भाईंदरमध्ये मराठी मतदारांची संख्या अवघी १६ ते १७ टक्के असल्याने, केवळ मराठी मतांच्या जोरावर निवडणूक जिंकण्याला शिवसेनेला मर्यादा आहेत. शहरात उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात आणि राजस्थानमधून स्थलांतरित झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. हा वर्ग पारंपरिकरीत्या भाजपकडे झुकलेला असल्याने शहरात भाजपचे वर्चस्व राहिले आहे. आता हेच वर्चस्व मोडीत काढण्यासाठी शिवसेनेने हिंदी भाषिक आणि जैन-राजस्थानी समाजातील नेत्यांना गळाला लावले आहे. भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता धूसर असल्याने अनेक नेते नाराज होते. हीच संधी साधत शिवसेनेने गेल्या काही दिवसांत पक्षप्रवेशाचा सपाटा लावला आहे. उत्तर भारतीय नेते राजन पांडे, नवीन सिंह ठाकूर, सुरेश दुबे आणि अनेक कार्यकर्ते तसेच राजस्थानी/जैन नेते शिवप्रकाश भुदेका, सुरेश राजपुरोहित, निरंजन मोर, सुरेंद्र भाटी यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
मतदारांचा कौल कोणाकडे?
भाजपच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फोडून शिवसेनेने संघटनात्मक विस्तार तर केला आहे. मात्र, नेत्यांमागून त्या समाजातील मतदारही शिवसेनेकडे वळणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. भाजपच्या या बालेकिल्ल्याला भगवा सुरुंग लावण्यात शिवसेना कितपत यशस्वी होते, याचा फैसला आगामी महापालिका निवडणुकीतच होईल.

