नवीन वर्ष स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज

नवीन वर्ष स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज

Published on

तुर्भे, ता. २९ (बातमीदार) : नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले असून, शहरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पब, रिसॉर्ट, तसेच गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये नववर्ष स्वागताच्या तयारीला वेग आला आहे. संगीत, नृत्य, खास मेन्यू, थीम पार्टी यामुळे शहरातील ठिकाणे गजबजून गेली आहेत.

बेलापूर, वाशी, नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली आणि घणसोली परिसरातील हॉटेल्समध्ये ३१ डिसेंबरसाठी आगाऊ बुकिंग जवळपास पूर्ण झाले आहे, तर अनेक कुटुंबांनी घरगुती पातळीवरच नववर्ष साजरे करण्याचा निर्णय घेतला असून, खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढली आहे. केक, मिठाई, सुकामेवा, बेकरी पदार्थ, तसेच पार्टी साहित्याला मोठी मागणी आहे.

महापालिका प्रशासनाकडून स्वच्छता, रुग्णवाहिका सेवा आणि आपत्कालीन सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नववर्ष आनंदात आणि सुरक्षितपणे साजरे करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यावर्षी ३१ डिसेंबरला एकादशी व दुसऱ्या दिवशी गुरुवार असल्याने अनेकांनी शाहाकारी खाद्यपदार्थांना प्राधान्य दिले आहे. एकूणच, जुन्या वर्षाला निरोप देत नव्या आशा-आकांक्षांसह ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी नवी मुंबईकर सज्ज झाले आहेत.

सुरक्षेसाठी प्रशासन सज्ज
सुरक्षेच्या दृष्टीने नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, प्रमुख चौकांवर नाकाबंदी, वाहन तपासणी आणि मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिस पथके आणि वाहतूक पोलिस तैनात असणार आहेत.

राजकीय मंडळी, कार्यकर्त्यांचा जोश
अनेकांनी शहराच्या बाहेर नवीन वर्ष साजरे करण्याचे बेत आखले असून, त्यासाठी रिसॉर्ट, फार्महाउस, समुद्रकिनारी असणारी हॉटेल्स आदींना पसंती दिली आहे. यंदा निवडणुकीचे वातावरण असल्याने बहुतांश राजकीय मंडळी व कार्यकर्त्यांनी यंदाचे नवीन वर्ष नवी मुंबईतच साजरे करण्याचा बेत केला आहे.

Marathi News Esakal
www.esakal.com