दिव्यात जागावाटपाबाबत हालचाली
भाजपमधील नाराज इच्छुक मनसेच्या वाटेवर
राजू पाटील यांचा दावा
डोंबिवली, ता. २९ : कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवा आणि १४ गावांच्या परिसरात राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत. महायुतीमधील जागावाटपाच्या पेचामुळे भाजपमधील अनेक इच्छुक कार्यकर्ते नाराज असून, ते मनसेच्या संपर्कात असल्याचा दावा मनसे नेते राजू पाटील यांनी केला आहे.
राजू पाटील यांनी दिव्यातील राजकीय स्थिती स्पष्ट करताना सांगितले की, मनसेकडून तीन पॅनेलमध्ये एकूण पाच जागांची मागणी करण्यात आली आहे. सध्या काही जागांवर शिवसेनेचे (शिंदे गट) विद्यमान नगरसेवक असल्याने त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. यामुळे गेली १० वर्षे नगरसेवक होण्याचे स्वप्न पाहणारे भाजपचे अनेक तरुण कार्यकर्ते आणि इच्छुक उमेदवार नाराज झाले आहेत. अनेक इच्छुक आमच्या संपर्कात आहेत, मात्र उमेदवारी देताना आम्ही सर्वप्रथम आमच्या जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय देऊ. कुठे समोरासमोर लढावे लागले तरी आम्ही आत्मविश्वासाने तयार आहोत, असेही राजू पाटील यांनी म्हटले.
‘ठाकरे’ ब्रँड नव्हे तर विचार!
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आगामी निवडणुकीत ‘ठाकरे ब्रँड’चा बँड वाजवू, असे विधान केले होते. यावर प्रत्युत्तर देताना राजू पाटील म्हणाले की, ‘‘ठाकरे हा केवळ ब्रँड नसून तो एक विचार आहे आणि हा विचार कोणीही संपवू शकत नाही. मराठी माणसासाठी लढण्याचा हा वारसा आम्ही समर्थपणे पुढे नेत आहोत.’’
निवडणुकीसाठी मनसेची रणनीती
पक्षात येणाऱ्या इच्छुकांऐवजी मूळ कार्यकर्त्यांना संधी देण्यावर भर देण्यात येणार आहे. युतीमुळे काही ठिकाणी अडचणी असल्या तरी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवणार आहोत. दिव्यासह १४ गावांच्या विकासासाठी मनसेकडे ठोस संकल्पना असून, स्वामींच्या आशीर्वादाने आमचे नगरसेवक निवडून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

