‘ग… गप्पांचा’ बालकथा संग्रहाचे प्रकाशन
‘ग… गप्पांचा’ बालकथा संग्रहाचे प्रकाशन
ग्रंथालीच्या ५१व्या वाचकदिनी साहित्यिकांचा सन्मान
घाटकोपर, ता. २९ (बातमीदार) : प्रा. मीरा कुलकर्णी लिखित ‘ग… गप्पांचा’ या बालकथा संग्रहाचा प्रकाशन सोहळा ग्रंथाली प्रकाशनतर्फे दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे पार पडला. ग्रंथालीच्या ५१व्या वाचकदिनी आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यात साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला.
सुप्रसिद्ध कथा-कादंबरीकार रंगनाथ पठारे, महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा व सांस्कृतिक विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी मराठीतील ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीकांत बोजेवार, ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ग्रंथालीचे दिनकर गांगल, सुप्रसिद्ध लेखक व संशोधक डॉ. नितीन रिंढे, कवी चंद्रशेखर सानेकर, कवयित्री-लेखिका प्रतिभा सराफ, निवेदिका मृण्मयी भजक, अस्मिता पांडे, साठये कॉलेजचे रघुनाथ शेटकर, लेखक-दिग्दर्शक प्रमोद पवार, श्रीनिवास नार्वेकर, सुदेश हिंगलासपुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुस्तकाचा परिचय करून देताना डॉ. लतिका भानुशाली म्हणाल्या की, आजच्या काळात मुलांशी संवाद कमी होत चालला आहे. अशा वेळी दिलखुलास गप्पांच्या माध्यमातून मूल्यशिक्षण देण्याचे महत्त्वाचे काम ‘ग… गप्पांचा’ या पुस्तकातून झाले आहे.
आपल्या मनोगतात प्रा. मीरा कुलकर्णी म्हणाल्या की, आजची मुले मोबाईलमध्ये गुंतलेली आहेत. घरात माणसे असूनही संवाद कमी झाला आहे. अशा वेळी शाळा, कुटुंब आणि मित्रांमधील गप्पांमधून मुलांना विचारांची दिशा मिळावी, वेगळी दृष्टी मिळावी, यासाठी हा कथासंग्रह लिहिला आहे.

