‘बांगलादेशी हटाओ, कल्याण शहर बचाओ’चा नारा
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांप्रती दुःख व्यक्त
कल्याण, ता. २९ (बातमीदार) : कल्याण पूर्व काटेमानिवली नाका परिसरात सकल समाजाच्या वतीने रविवारी (ता.२९) सायंकाळी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. या सभेला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सभेदरम्यान वक्त्यांनी बांगलादेशातील हिंदूंना भेडसावणाऱ्या परिस्थितीबद्दल संताप व्यक्त करीत ‘बांगलादेशी हटाओ, कल्याण शहर बचाओ’ अशा घोषणा दिल्या.
नागरिकांनी देशात आणि शहरात घुसखोरीच्या घटना टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहनही केले. शहरात कोणतेही संशयास्पद वा बेकायदेशीरपणे राहणारे विदेशी नागरिक आढळले, तर त्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन या प्रसंगी करण्यात आले. तसेच, कुणालाही आसरा देताना त्यांची ओळख निश्चित करून घ्यावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांना कळवावे, असे सांगण्यात आले. या श्रद्धांजली सभेत परिसरातील अनेक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान बांगलादेश मधील हिंसाचाराचा यावेळी निषेध नोंदवण्यात आला.

